कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत

By योगेश पांडे | Published: March 27, 2024 02:01 PM2024-03-27T14:01:06+5:302024-03-27T14:02:18+5:30

महायुतीला राज्यात ४५ हून अधिक जागा मिळतील

big responsibility will come to krupal tumane said cm eknath shinde | कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत

कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत आलेले राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेषत: सलग दोन वेळा निवडून आलेले कृपाल तुमाने नाराज असल्याच्या चर्चांनादेखील उधाण आले होते. मात्र लवकरच कृपाल तुमाने यांच्याकडे शिवसेनेची मोठी जबाबदारी येणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात दिले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांनी बुधवारी निवडणूक अर्ज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रामटेकमधील राजू पारवे यांनी कॉंग्रेसमध्ये राम राहिलेला नाही म्हणत महायुतीत प्रवेश केला. त्यांच्या पाठीशी माजी खासदार कृपाल तुमाने भक्कमपणे आहेत. तुमाने यांनी १० वर्ष पूर्ण प्रामाणिकपणे व मेहनतीने लोकविकासाची कामे केली. त्याची पोचपावती त्यांना निश्चित मिळेल व तुमाने यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी म्हणजे काय ?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीसाठी सुरुवात अतिशय मोठी झाली आहे. नितीन गडकरी यांनी जे काम केले आहे ते देशाने पाहिले आहे. ६० टक्के रस्ते बांधण्याचे काम त्यांच्या हातून झाले आहेत. इन्फ्रामॅन अशी त्यांची ओळख आहे. त्यांना निश्चितच रेकॉर्ड मताने जनता निवडून देईल. महाविकास आघाडी म्हणजे काय हेच माहिती नाही असे चित्र आहे. हे सर्व पक्ष मोदीद्वेषातून व स्वार्थासाठी एकत्रित आले आहेत . ते जितके जास्त आरोप करतील तेवढ्या जास्त जागा महायुतीला मिळतील. राज्यात ४५ हून अधिक जागा महायुतीचे उमेदवार जिंकतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

Web Title: big responsibility will come to krupal tumane said cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.