Secret to actress Neena Gupta? | अभिनेत्री नीना गुप्ता उलगडणार हे रहस्य?जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

नीना गुप्ता यांचे नाव घेतले की नजरेच्या नजाकतींनी भारलेला सहज अभिनय आणि त्यांचा बोलका चेहरा डोळ्यासमोर येतो. अनेक हिंदी चित्रपटांसोबत इंग्रजी आणि इतर भारतीय भाषिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या आहेत. परंतू, मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर कधीच काम केले नाही. पण, आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पट्टशिष्य, हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक अग्रगण्य लेखक-दिग्दर्शक श्याम महेश्वरी हे ‘चरणदास चोर’ या मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. येत्या मंगळवारी 28 नोव्हेबर रोजी मुंबईत आयोजित केलेल्या ट्रेलर प्रदर्शन व संगीत प्रकाशन सोहळ्यासाठी अभिनेत्री नीना गुप्ता उपस्थित राहणार आहेत. यांच्या हस्ते संगीत प्रकाशन व ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नीना गुप्ता आपली भूमिका मांडतील.
 
‘चरणदास चोर’ या सिनेमाच्या पहिल्या टीजर पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. याला कारण पोस्टरवर झळकलेली रंगीबेरंगी पेटी. कधी रेल्वे रुळावर तर कधी तलावातील बोटीत....कधी शनिवार वाड्यावर तर कधी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर दिसणाऱ्या या पेटीत नक्की दडलंय काय? याचा उलगडा काही केल्या होत नव्हता.पण,येत्या मंगळवारी मुंबईतील कार्यक्रमात खुद्द सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता ‘चरणदास चोर’च्या पेटीचे रहस्य उलगडणार आहेत.
 
ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी यांच्या सारख्या महान चित्रकर्मींच्या मार्मिक पण सहज विनोदाच्या शैलीने प्रभावित होऊन लेखक-दिग्दर्शक श्याम महेश्वरी आणि क्रीएटीव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे यांनी त्याच पठडीतील पण आजच्या काळाला सुसंगत असणारा ‘चरणदास चोर’ या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्याम महेश्वरी यांनी ‘सास भी कभी बहु थी’, ‘कसोटी जिंदगी की’, ‘पलछीन’, ‘मंथन’, ‘कहानी घर घर की’, सात फेरे’ व ‘बंधन’ पासून ते अलिकडच्या ‘जोधा अकबर’ व ‘एक दुजे के वास्ते‘ पर्यंत अनेक टीव्ही मालिकांच्या हजारो भागांचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. भारतीय क्रिकेटपटू महेन्द्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत एम. एस. धोनी या चित्रपटाच्या लेखनात सहाय्यक लेखक म्हणून काम पाहिले आहे. 1994 या वर्षी नीना गुप्ता यांनी श्याम महेश्वरी यांना मालिका दिग्दर्शनाची पहिली संधी दिली आणि त्यानंतर नीना गुप्ता यांच्या निर्मिती संस्थेने निर्मिती केलेल्या अनेक मालिकांचे श्याम महेश्वरी यांनी दिग्दर्शन केले. त्याच बरोबर अनुभव सिन्हा यांच्यासारख्या दिग्गज सिनेदिग्दर्शकासोबत सहायक म्हणून काम केले आहे. श्याम महेश्वरी यांनी या दोन्ही महानुभूतींच्या पावलावर पाऊल ठेवून ‘चरणदास चोर’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत लेखक-दिग्दर्शक म्हणून पहिले पाऊल ठेवले आहे. त्यांच्या पहिल्या कलाकृतीला आशिर्वाद देण्यासाठी खुद्द नीना गुप्ता उपस्थित राहून संवाद साधणार आहेत.

Also Read:नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर मागितले काम!!
Web Title: Secret to actress Neena Gupta?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.