चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 02:44 PM2019-05-13T14:44:58+5:302019-05-13T14:45:43+5:30

अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे का, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अशोक सराफ नोकरी करत होते. 

Marathi actor Ashok saraf was working in bank before coming in acting field | चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम

googlenewsNext
ठळक मुद्देमी १९७४ला पहिला चित्रपट केला. पण त्यानंतरही मी बँकेत नोकरी करणे सोडले नव्हते. पण चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला बँकेत जाणे जमायचे नाही. १९७८ ला तर संपूर्ण वर्षभर मी बँकेत गेलोच नव्हतो.

अशोक सराफ यांनी मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत आपले प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे का, चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अशोक सराफ नोकरी करत होते. 

अशोक सराफ चित्रपटसृष्टीत येण्याआधी एका बँकेत काम करत होते हे खूपच कमी जणांना माहिती आहे. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं त्यांनी बँकेत काम केले.  त्यांच्या बँकेतील नोकरीविषयी त्यांनी स्वतःच लोकमतशी बोलताना सांगितले होते. 

अशोक सराफ यांनी सांगितले होते की, मी १९७४ला पहिला चित्रपट केला. पण त्यानंतरही मी बँकेत नोकरी करणे सोडले नव्हते. पण चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला बँकेत जाणे जमायचे नाही. १९७८ ला तर संपूर्ण वर्षभर मी बँकेत गेलोच नव्हतो. मला बरे नाही असे सांगत मी मेडिकल सर्टिफिकेट दिले होते. पण मी काही महिने ऑफिसला गेलेलोच नसल्याने माझ्या ऑफिसमधील काही वरिष्ठ मंडळी घरी आली. मी त्यावेळी घरी नव्हतो. माझ्या बहिणीने दरवाजा उघडला. मी कुठे आहे असे तिला विचारले असता मी कोल्हापूरला गेलो असल्याचे तिने सांगितले. 

या तिच्या उत्तराने आता माझी वाट लागली असेच मला वाटले होते. पण माझ्या बँकेतील लोकांनी मला खूप सांभाळून घेतले. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी माझा रिपोर्ट तीन महिने वरिष्ठांना दिलाच नव्हता. माझ्या बँकेतील मंडळी माझ्या वाटणीची कामे करत असत. मी चित्रपटात काम करत असलो तरी नोकरी सोडण्याचा धोका मी पत्करू शकत नव्हतो. त्यामुळे मला नोकरीतून हकलून देत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही असेच मी ठरवले होते. पण अखेर माझ्यामुळे माझ्या सहकर्मचाऱ्यांना त्रास होत आहे असे मला वाटल्याने मी नोकरी सोडली.

Web Title: Marathi actor Ashok saraf was working in bank before coming in acting field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.