bhau kadam will play sweeper role in nashibwan marathi movie | भाऊ कदमने दिवाळीच्या निमित्ताने केले हे सामाजिक कार्य
भाऊ कदमने दिवाळीच्या निमित्ताने केले हे सामाजिक कार्य

ठळक मुद्देपरिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं असून याच संदेशपर वांद्रे येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' या आगामी चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली. या सिनेमात भाऊ कदम मुख्य भूमिकेत असून वांद्रे येथील निवासी वसाहतीमध्ये झालेल्या स्वच्छता मोहिमेत त्याचा देखील मोलाचा हातभार लाभला.उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारित असलेल्या 'नशीबवान' या सिनेमात भाऊ कदम एका सफाई कामगाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या पाच दिवसांचे महत्त्व प्रचंड असते. शिवाय हा उत्सव फटाक्यांच्या आतषबाजींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळेच तर या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी फटाके वाजवले जातात. मात्र या उत्सवामध्ये आपण नकळत पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत, याचे भान राहत नाही. कारण, ध्वनी आणि वायू प्रदूषणाला आमंत्रण देणाऱ्या या फटाक्यांचा कचरा दिवसागणिक वाढत चालला आहे. मात्र या कचऱ्याकडे सहजपणे कानाडोळा केला जातो. परिसर अस्वच्छ करणारा हा कचरा त्वरित उचलणे गरजेचं असून याच संदेशपर वांद्रे येथील निवासी वसाहतीमध्ये 'नशिबवान' या आगामी चित्रपटाच्या टीमने स्वच्छता मोहिम राबवली. 

लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित नशिबवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात भाऊ कदम मुख्य भूमिकेत असून वांद्रे येथील निवासी वसाहतीमध्ये झालेल्या स्वच्छता मोहिमेत त्याचा देखील मोलाचा हातभार लाभला. दिवाळीच्या उत्तरार्धात म्हणजेच भाऊबिजेच्या मुहूर्तावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेसाठी स्थानिकांचादेखील उत्तम प्रतिसाद लाभला. या स्वच्छता मोहिमेमुळे फटाक्यांमुळे झालेला कचरा काही प्रमाणात का होईना कमी झाला याचे समाधान या चित्रपटाच्या टीममधील प्रत्येक मंडळीच्या चेहऱ्यावर दिसत होते.  

उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारित असलेल्या 'नशीबवान' या सिनेमात भाऊ कदम एका सफाई कामगाराच्या भूमिकेत झळकणार असून ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिवाय या चित्रपटात भाऊ कदम सोबतच मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

'नशीबवान' या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची भूमिका बजावली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 
 


Web Title: bhau kadam will play sweeper role in nashibwan marathi movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.