“प्रकाश आंबेडकरांनी मविआला झुलवत ठेवले, ही तर भाजपाला मदत”; ठाकरे गटाकडून उघड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:00 PM2024-03-27T13:00:24+5:302024-03-27T13:01:24+5:30

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News: एका दिवसांत उमेदवार तयार होत नाहीत. निवडणुकीची तयारी आधीपासून केली जाते. एक प्रकारे भाजपाला मदत असल्याची टीका ठाकरे गटाने वंचितने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर केली.

shiv sena thackeray group ambadas danve reaction over vanchit bahujan aghadi prakash ambedkar declared candidates for lok sabha election 2024 | “प्रकाश आंबेडकरांनी मविआला झुलवत ठेवले, ही तर भाजपाला मदत”; ठाकरे गटाकडून उघड नाराजी

“प्रकाश आंबेडकरांनी मविआला झुलवत ठेवले, ही तर भाजपाला मदत”; ठाकरे गटाकडून उघड नाराजी

Shiv Sena Thackeray Group Ambadas Danve News:प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत असावे, अशी आमची आजही भूमिका आहे. लोकशाहीला नाकारत हुकुमशाही आणू पाहणाऱ्या आणि संविधानात बदल करू पाहणाऱ्या भाजपाला सामोरे जायचे असेल तर एकत्रितपणे लढले पाहिजे. चर्चेची दारे अद्यापही बंद झालेली नाही. मात्र, वंचितकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली असेल आणि मविआसोबत ते येणार नसतील, तर ती एक प्रकारे भाजपाला मदत होऊ शकेल, असे ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, जागा कमी आणि जास्त हा मुद्दा नाही. महाविकास आघाडीनेप्रकाश आंबेडकर यांना समाधानकारक प्रस्ताव दिला होता. भाजपाविरोधात सगळ्यांनी एकत्र राहायला हवे होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीची जास्त उमेदवारांची यादी जाहीर होते, याचा अर्थ त्यांना हे करायचेच नव्हते का, महाविकास आघाडीला झुलवत ठेवायचे होते का, असे प्रश्न आता मनात येत आहेत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. 

ही तर भाजपाला मदत

एवढे उमेदवार एका रात्रीत तयार होत नाहीत. निवडणुका म्हटले की, त्याची तयारी करावी लागते. याचा अर्थ तुमची यादी आधीच तयार होती. भाजपाला मदत करण्याचा प्रयत्न करत नाही ना, यावर विचार होण्याची आवश्यकता आहे, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आम्ही आजही चर्चेला तयार आहोत. उमेदवारी यादी जाहीर केली, याचा अर्थ ती अंतिम होत नाही. उमेदवार निवडणूक अर्ज करतील, मागे घेतील, अशा अनेक प्रक्रिया अद्याप बाकी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने दिलेला प्रस्ताव स्विकारावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकरांना आहेच, असे अंबादास दानवे म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ठाकरे गटाचे काम करणार आहे. कोणत्याही व्यक्तीचे काम करणार नाही. सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख जी काही जबाबदारी देतील ती सर्व प्रामाणिकपणे पार पाडणार आहे, असे दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले. यावरून खैरे आणि दानवे यांचा वाद अजूनही संपला नसल्याचे स्पष्ट होते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
 

Web Title: shiv sena thackeray group ambadas danve reaction over vanchit bahujan aghadi prakash ambedkar declared candidates for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.