निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:25 AM2024-04-02T07:25:02+5:302024-04-02T07:34:27+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काही निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. विशेषत: भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली. 

Maharashtra Lok Sabha Election 2024: Retired Chartered Officers' dream of becoming a Member of Parliament shattered, BJP has no chance for any aspirant | निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

 मुंबई - लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून काही निवृत्त आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. विशेषत: भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे सचिव राहिलेले मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना उस्मानाबादमध्ये भाजपकडून उमेदवारी दिली जाणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, आता तेथे अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. त्या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत. 

माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते धुळे मतदारसंघात लढण्यास इच्छुक होते आणि तशी मागणीही त्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, तेथे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाच पक्षाने पुन्हा संधी दिल्याने दिघावकर यांचे स्वप्न भंगले. समृद्धी महामार्गाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे माजी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महायुतीतर्फे लढविले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. 

माजी आयपीएस रहेमान धुळ्यात 
अब्दुर रहेमान हे वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. २००२ ते २००४ या काळात 
ते धुळ्याचे पोलिस अधीक्षक होते. १९९७ च्या बॅचचे असलेले रहेमान यांनी २०१९ मध्ये सीएएच्या निषेधार्थ राजीनामा दिला होता. तेव्हा ते अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी होते. ते मूळ बिहारचे रहिवासी आहेत. आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर ते आयपीएस झाले.

किशोर गजभिये रिंगणात
निवृत्त आयएएस अधिकारी किशोर गजभिये हे रामटेक मतदारसंघात अपक्ष लढत आहेत. २०१९ मध्ये ते याच मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी त्यांचा १,२६,७८३ मतांनी पराभव केला होता. गजभिये हे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी होते. २०१४ मध्ये त्यांनी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीकडून निवडणूक लढविली होती, पण ते पराभूत झाले होते.

श्रीनिवास पाटील स्वेच्छेने रिंगणातून बाहेर
- साताराचे विद्यमान खासदार आणि माजी आयएएस अधिकारी श्रीनिवास पाटील यावेळी रिंगणात नसतील. प्रकृतीच्या कारणाने आपण लढू इच्छित नाही, असे त्यांनी शरद पवार गटाला कळविले आहे. पाटील यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. 
- गडचिरोलीतील काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान हे उत्पादन शुल्क खात्यात अधिकारी होते, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Retired Chartered Officers' dream of becoming a Member of Parliament shattered, BJP has no chance for any aspirant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.