बीडमध्ये शरद पवार मोठा डाव टाकणार; ज्योती मेटेंसोबत तब्बल दीड तास चर्चा, पक्षप्रवेशाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 07:14 PM2024-03-19T19:14:55+5:302024-03-19T19:22:29+5:30

भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात व्यूहरचना आखण्यास पवार यांनी सुरुवात केली आहे.

lok sabha election Sharad Pawar will make a big move in Beed One and a half hour discussion with Jyoti Mete | बीडमध्ये शरद पवार मोठा डाव टाकणार; ज्योती मेटेंसोबत तब्बल दीड तास चर्चा, पक्षप्रवेशाची शक्यता

बीडमध्ये शरद पवार मोठा डाव टाकणार; ज्योती मेटेंसोबत तब्बल दीड तास चर्चा, पक्षप्रवेशाची शक्यता

Jyoti Mete Beed ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. पक्षफुटीनंतर बहुसंख्य आमदार आणि नेते अजित पवारांसोबत गेल्याने यंदाच्या निवडणुकीत उमेदवार निश्चिती करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मात्र कसलेले राजकारणी असलेले शरद पवार जागावाटपात आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी आपलं संपूर्ण कसब पणाला लावताना पाहायला मिळत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात व्यूहरचना आखण्यास पवार यांनी सुरुवात केली असून आज त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदी बाग इथे शरद पवारांची भेट घेतली असून बीड लोकसभेबाबत पवार आणि मेटे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर ज्योती मेटे या राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांचा शिवसंग्राम हा पक्ष सध्या महायुतीत आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावं, अशी मागणीही शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. आता त्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याने त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्यास जिल्ह्यात पक्षाला ताकद मिळणार आहे. कारण सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्याने मराठवाड्यात आक्रमक रूप धारण केलं असून ज्या विनायक मेटे यांचा मराठा आरक्षण लढ्यात दीर्घकाळ सहभाग राहिला त्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या रुपाने बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळू शकते.
 

Web Title: lok sabha election Sharad Pawar will make a big move in Beed One and a half hour discussion with Jyoti Mete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.