दिवस वाईट तरी काँग्रेसला नाराजीचा फटका! धुळ्यात उमेदवार जाहीर होताच जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:07 PM2024-04-11T13:07:01+5:302024-04-11T13:07:53+5:30

Dhule Lok sabha Cangress Shobha Bacchav: माजी मंत्री शोभा बच्छाव यांना २००९ च्या पालकमंत्री पदाच्या जोरावर धुळ्यात उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांच्याविरोधात स्थानिक नेतृत्वाने बंड केले आहे.

Even if the day is bad, Congress is hit by resentment! As soon as the candidate was announced in Dhule, the office bearers including the district president resigned | दिवस वाईट तरी काँग्रेसला नाराजीचा फटका! धुळ्यात उमेदवार जाहीर होताच जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

दिवस वाईट तरी काँग्रेसला नाराजीचा फटका! धुळ्यात उमेदवार जाहीर होताच जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

सध्या देशपातळीवर काँग्रेसला वाईट दिवस आले आहेत. राज्यातही काँग्रेसचे नेते पक्ष सोडून भाजपात गेले आहेत. काही नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली आहे. अशातच आज धुळ्यातही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री शोभा बच्छाव यांना २००९ च्या पालकमंत्री पदाच्या जोरावर धुळ्यात उमेदवारी देण्यात आली असली तरी त्यांच्याविरोधात स्थानिक नेतृत्वाने बंड केले आहे. बच्छाव यांचे नाव जाहीर होताच काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी राजीनामा देत उमेदवार बदलण्यासाठी दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 

बच्छाव यांना काँग्रेस मधीलच पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाशी एकनिष्ठ असून आपल्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया, सनेर यांनी दिली आहे. हे सांगताना सनेर यांचा कंठ दाटूना आला होता. 

मुळात शोभा बच्छाव या धुळ्याच्या नाहीत. त्यांचे वडील धुळ्यात शासकीय नोकरीला असल्याने, शोभा यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालेले आहे. त्या नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील रहिवासी असून, त्यांची सासरवाडी मालेगाव मध्य मतदारसंघातील सोनज येथील आहे. डॅा. बच्छाव या २००९ मध्ये धुळे जिल्हयाच्या पालकमंत्री होत्या. तर सध्या धुळे जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी आहेत. यावरून सनेर यांनी पक्षाने बाहेरच्या उमेदवाराला संधी दिल्याचा आरोप केला आहे. 

आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राजीनामा दिला असून पुढील दोन दिवसात उमेदवार बदलाबाबत कुठलाही निर्णय न झाल्यास आपण कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा सनेर यांनी दिला आहे. याचबरोबर शिंदखेडा तालुक्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजेंद्र पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तिकीट वाटपामध्ये घोळ झाला असल्याचा आरोप पाटील यांनी केला असून काँग्रेसमधील इतरही पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे. 

काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांचं नाव चर्चेत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नाशिकच्या बच्छाव यांना तिकीट देण्यात आले. यामुळे काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र चालू झाले असून विजेंद्र पाटील यांच्या पाठोपाठ लोकसभा मतदारसंघ समन्वयक कुलदीप निकम यांनी देखील राजीनामा दिला आहे. याच पाठोपाठ सोनू झालसे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर येत्या काही तासांमध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता मोठ्या प्रमाणावर धुळे जिल्ह्यामध्ये रंगत आहे.

Web Title: Even if the day is bad, Congress is hit by resentment! As soon as the candidate was announced in Dhule, the office bearers including the district president resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.