एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:28 AM2024-03-13T11:28:55+5:302024-03-13T11:29:05+5:30

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा गोंधळ कायम : राष्ट्रवादीच्या बैठकीत एकनाथ खडसेंनी केली उमेदवारीच्या माघारीची घोषणा

congress claims but interviews of four people from ncp in jalgaon raver lok sabha election 2024 | एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती!

एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती!

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : महाविकास आघाडी असो किंवा महायुती या दोघांपैकी कोणीच लोकसभेच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. असे असताना रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला सुटणार म्हणून आमदार एकनाथ खडसे यांनी आपणच उमेदवार राहू, असे जाहीर केले होते, मात्र अचानक प्रकृतीचे कारण पुढे करून त्यांनी यातून माघार घेतली. हाच धागा पकडून काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला आहे. वरिष्ठ पातळीवर यावर चर्चा होत असताना मंगळवारी जळगावात राष्ट्रवादीने चार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

लोकसभेसाठी रावेरची जागा पूर्वीपासून काँग्रेसकडे तर जळगावची जागा राष्ट्रवादीकडे आहे. सततच्या पराभवामुळे यंदा रावेरच्या जागेत बदल झाला. या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला. शरद पवार व जयंत पाटील यांनी ही जागा आपल्याकडे असल्याचे सांगून संभाव्य उमेदवार म्हणून एकनाथ खडसेंचे नाव जाहीर केले. खडसेंनीदेखील आपणच उमेदवार राहू असे सतत सांगितले होते. मात्र, आता प्रकृतीचे कारण पुढे करून त्यांनी निवडणुकीला नकार देत मंगळवारी पक्ष बैठकीतही याचा पुनरुच्चार केला.

खडसेंनी माघार घेतल्याने काँग्रेसचा दावा

खडसे उमेदवार नसल्याने काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा करून आमदार शिरीष चौधरी यांच्यासोबत दोन नावे पुढे केली आहेत. त्याला खुद्द जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दुजोरा दिला आहे. एकीकडे काँग्रेस दावा करीत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने इच्छुकांची नावे मागवली, त्यात चार जणांनी तयारी दर्शविल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या या चौघांनी दर्शविली तयारी

राष्ट्रवादीच्या बैठकीच्या प्रारंभी इच्छुकांच्या नावावर चर्चा करून मते जाणून घेण्यात आली. यावलचे नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी प्राचार्य एस. एस. राणे, माजी आमदार अरुण पाटील, रमेश पाटील या चौघांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. त्याशिवाय भुसावळमधून एका मोठ्या कंत्राटदारानेही इच्छा व्यक्त केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. अंतिम क्षणी कोणीच निवडणूक लढायला तयार नसेल तर आपण स्वतः लडू, असेही खडसे म्हणाले.

खडसेंच्या नावाचा ठराव

- राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आता गॅरंटीचा अतिरेक झालेला आहे. जनता या गॅरंटी व सरकारला कंटाळली आहे. तुतारी वाजविणारा उमेदवार आपल्याला संसदेत पाठवावचा आहे असे आवाहन केले.

- एकनाथ खडसे यांनी उमेदवारी करावी अशी सूचना माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी मांडली. त्यावर तसा ठराव करीत असल्याची घोषणा देवकरांनी केली. रावेरची जागा ही राज्य नाही तर देशासाठी प्रतिष्ठेची बनली असल्याचे देवकर म्हणाले. जळगावमध्ये देखील ठाकरे गटाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

भाजपात जायचेच असेल तर शरद पवारांच्या सल्ल्याने उघडपणे जाईन!

ईडी व पोलिस केसेसच्या वेळी भाजपात गेलो नाही, ी, आता कशाला जाऊ, मला तेथे जाण्याची आवश्यकता नाही. जायचेच असेल तर लपून छपून नाही तर शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच उघडपणे जाईन, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चाना उत्तर दिले. खासदार रक्षा खडसे राष्ट्रवादीत येणार नाही. दहा वर्षे भाजपाच्या खासदार राहिल्या आहेत, त्यामुळे पक्ष सोडण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे, असेही स्पष्टीकरण खडसे यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर, जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, महानगराध्यक्षा मंगला पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, वाल्मिक पाटील, जळगाव बाजार समितीचे संचालक अरुण पाटील आदीसह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

Web Title: congress claims but interviews of four people from ncp in jalgaon raver lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.