Manoj Jarange: अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 01:01 PM2024-03-24T13:01:13+5:302024-03-24T13:03:53+5:30

अंतरवालीतील बैठकीत उपस्थितांशी बोलताना जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे.

maratha reservation Manoj Jarange patil big announcement about the election from the meeting in Antarwali sarati | Manoj Jarange: अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा 

Manoj Jarange: अंतरवालीतील निर्णायक बैठकीतून मनोज जरांगेंची निवडणुकीविषयी मोठी घोषणा 

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील मैदानावर आज मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक बोलावली होती. या बैठकीत उपस्थितांशी बोलताना जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे. "बैठकीला उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाने आपआपल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घ्यावी आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत समाजातील लोकांचा काय विचार आहे ते जाणून घ्यावं. लोकांचं काय मत आहे, ते मला पुढील चार दिवसांत लेखी आणून कळवा, त्यानंतर आपण अंतिम निर्णय घेऊ," अशी भूमिका मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत मांडली आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी आपलं वैयक्तिक मतंही नोंदवलं आहे. "माझं तर म्हणणं आहे की, आपण लोकसभेच्या नादी न लागता विधानसभा निवडणुकीत यांना आपला हिसका दाखवून देऊ," असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली असली तरी सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अशी मागणी मनोज जरांगेंकडून केली जात आहे. मात्र सरकारने याबाबत अद्याप निर्णय घेतला नसून लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता आपल्याला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल, असं सांगत मनोज जरांगेंनी आज अंतरवाली इथं बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

"निवडणूक लढवण्याबाबत भावनिक निर्णय घेऊन चालणार नाही. समाजाचा पराभव होता कामा नये. यासाठी सर्वांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ. तुम्ही गावात बैठका घेऊन लोकांचं काय म्हणणं येत आहे, ते लिहून काढा आणि ३० तारखेच्या आत माझ्यापर्यंत पोहोचवा. ३० तारखेला आपण अंतिम निर्णय घेऊ," असं जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. तसंच वैयक्तिरित्या आपण लोकसभेची निवडणूक न लढवता समाजाने विधानसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी, या मताचा मी असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, मी स्वत: निवडणूक लढवणार नाही, या माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे.

Web Title: maratha reservation Manoj Jarange patil big announcement about the election from the meeting in Antarwali sarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.