जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

By विजय मुंडे  | Published: April 10, 2024 12:26 PM2024-04-10T12:26:50+5:302024-04-10T12:32:18+5:30

मविआच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष : पुढील आठवड्यापासून पेटणार राजकीय आखाडा

Jalna Constituency is with the Congress, AB Form will fall in whose hands to support the Mahayuti! | जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

जालना : जालना लोकसभा निवडणुकीची जागा परंपरेनुसार काँग्रेस पक्षाकडे आली आहे. पुढील आठवड्यातच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा अर्थात मविआचा उमेदवार कोण ? याकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे तर वंचितकडून प्रभाकर बकले यांची उमेदवारी घोषित झाली आहे. या उमेदवारांनी मतदार संघातील शहरे, गावे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. परंतु, प्रमुख विरोधक असलेल्या मविआकडून जालन्याची जागा कोणत्या पक्षाला सुटणार व उमेदवार कोण असणार? यावरच पक्षश्रेष्ठींकडून अंतिम निर्णय घेतला जात नव्हता. सांगलीतील जागेवर बरीच गणिते अवलंबून होती. अधिकृत घोषणा होत नसल्याने मविआतील पदाधिकारी, कार्यकर्ते गोंधळात होते. अखेर मंगळवारी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत मविआच्या नेत्यांनी जागा वाटपाचा तिढा सोडवत घोषणा केली आहे. त्यात परंपरेनुसार जालन्याची जागा काँग्रेसकडे राहिली आहे. त्यामुळे आता महायुतीला अर्थात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसचा अर्थात मविआचा उमेदवार कोण राहणार? ‘कोणाच्या हाती पक्षाचा एबी फॉर्म पडणार?’ याची उत्सुकता पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही लागली आहे.

१८ एप्रिल रोजी अधिसूचना होणार जारी
१. जालना लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून, २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहणार आहे.
२. नऊ दिवसानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यास आणखी विलंब होतो की तत्काळ निर्णय घेतला जातो हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

कल्याण काळे आखाड्यात, मुंढे, राखही चर्चेत
 काँग्रेसकडून माजी आमदार कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर असून, पक्षश्रेष्ठींनी संकेत दिल्यामुळे त्यांनी मतदार संघात बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
 दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, ओबीसीचे नेते सत्संग मुंढे, राजेंद्र राख यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी या दोन्ही नेत्यांनी जोर लावला आहे.
 त्यामुळे कल्याण काळेंनाच उमेदवारी मिळते की इतरांना संधी मिळते याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: Jalna Constituency is with the Congress, AB Form will fall in whose hands to support the Mahayuti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.