काँग्रेसच्या इच्छुकांना हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 08:04 AM2024-03-19T08:04:41+5:302024-03-19T08:05:32+5:30

ऐनवेळी तिकीट जाहीर करू नका कार्यकर्त्यांची मागणी.

lok sabha election 2024 congress aspirants await high command decision | काँग्रेसच्या इच्छुकांना हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा

काँग्रेसच्या इच्छुकांना हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक उमेदवार हायकमांडच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ऐनवेळी तिकीट जाहीर करु नका, लवकर निर्णय घ्या, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी काल, सोमवारी दिल्लीत बैठक बोलावली होती. पाटकर व विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनाही बैठकीसाठी बोलावले होते. दोघेही रविवारीच दिल्लीत पोचले परंतु अखेरच्या क्षणी बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते निराश झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन यांना उशिरा तिकीट जाहीर केली होते. प्रचारासाठी अवघे ५१ दिवस मिळतात, त्यामुळे तिकिट वाटपासाठी विलंब लावू नये, असे कार्यकर्त्यांची मागणी आहे.

उत्तर गोव्यात रमाकांत खलप, विजय भिके, सुनील कवठणकर व राजन घाटे यांच्यात स्पर्धा आहे. तर दक्षिण गोव्यात खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व कॅप्टन विरीयातो फर्नाडिस यांच्यात स्पर्धा आहे. 

आमचे धोरण आधीच ठरलेले आहे. योग्यवेळी उमेद्वार जाहीर केले जातील. भाजपने दक्षिण गोव्यात उमेदवार दिल्यानंतरच काँग्रेस आपले उमेदवार जाहीर करणार, असे मुळीच नाही. उमेदवार जाहीर केले नसले तरी आमचे काम चालू आहे. भाजप उमेदवार जाहीर करणार याच्याशी आमच्या स्ट्रेटेजीचा काहीही संबंध नाही, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

तिकिटाच्या दाव्यावर मी ठाम : खलप

उत्तर गोवा मतदारसंघातून आपणालाच तिकिट मिळेल, अशी खात्री माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले की, मी माघार वगैरे घेतलेली नाही. तिकिटाच्या दाव्यावर मी ठाम आहे. 'इंडिया युतीबद्दल देशभरात काँग्रेसच्या विविध पक्षांकडे वाटाघाटी चालू आहेत. त्यामुळेच विलंब होत असावा.

मी इच्छुक नाही : फेरेरा

उत्तर गोव्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असती तर पूर्वीच आपण रस दाखवला असता. आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यास कोणत्याच प्रकारचे सारस्व नाही, अशी माहिती आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा यांनी दिली. आपण निवडणूक लढवावी म्हणून कोणीच आपल्याशी संपर्क साधलेला नाही. उत्तर गोव्यातून आपले नाव जे समोर आले आहे ती अफवा असल्याचे स्पष्ट केले.

 

Web Title: lok sabha election 2024 congress aspirants await high command decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.