'छोट्या पडद्याने मिळवून दिली ओळख'

By Admin | Published: January 4, 2017 02:17 AM2017-01-04T02:17:09+5:302017-01-04T02:17:09+5:30

का रे दुरावा या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुयश टिळक सध्या एका मालिकेत झळकतो आहे. त्याची या मालिकेतील भूमिका का रे दुरावा या मालिकेतील भूमिकेपेक्षा

'Small Screen Recognition' | 'छोट्या पडद्याने मिळवून दिली ओळख'

'छोट्या पडद्याने मिळवून दिली ओळख'

googlenewsNext

- Prajakta Chitnis

 का रे दुरावा या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता सुयश टिळक सध्या एका मालिकेत झळकतो आहे. त्याची या मालिकेतील भूमिका का रे दुरावा या मालिकेतील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, असे तो सांगतो. या त्याच्या नव्या भूमिकेबाबत सुयशने सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...

का रे दुरावा या मालिकेनंतर छोट्या पडद्यावर परतायला येवढा वेळ का लागला? दरम्यानच्या काळात मालिका करायच्याच नाही, असे तू ठरवले होतेस का?
का रे दुरावा या मालिकेनंतर मला छोट्या पडद्यावरच्या अनेक आॅफर्स येत होत्या; पण कोणतीही भूमिका तितकीशी आवडत नव्हती. त्यामुळे मी छोट्या पडद्यापासून दूर राहणेच पसंत केले होते. यादरम्यान मी स्ट्रॉबेरी हे नाटक केले. माझ्या या नाटकाला सगळ्याच वयोगटांतील लोकांनी पसंती दर्शवली. छोट्या पडद्यावर त्याच-त्याच भूमिका करायच्या नाहीत, असे मी आधीपासूनच ठरवले होते. त्यामुळे माझ्या का रे दुरावा, दूर्वा, पुढचे पाऊल या प्रत्येक मालिकेमधील भूमिका खूपच वेगळ्या आहेत. त्यामुळे योग्य पटकथा आणि वेगळी भूमिका मिळाल्यावर पुन्हा मालिकांकडे वळायचे, असे मी आधीच ठरवले होते.

नव्या मालिकेबद्दल विचारण्यात आले, त्या वेळी तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
या मालिकेबाबत विचारण्यासाठी चिन्मय मांडलेकरचा मला फोन आला होता. चिन्मय मांडलेकर एखादी गोष्ट करीत आहे, म्हणजे ती चांगली असणारच, याचा मला संपूर्ण विश्वास होता. केवळ यादरम्यान मी एका चित्रपटासाठी वजन वाढवल्यामुळे थोडासा द्विधा अवस्थेत होतो. पण, या मालिकेची निर्मिती चिन्मय करीत असल्याने मी काहीच मिनिटांत या मालिकेसाठी होकार दिला.

तू चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम करीत आहेस. कोणते माध्यम तू जास्त एन्जॉय करतोस?
कोणत्याही माध्यमामध्ये कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते. मालिकेत एक कथा अधिक काळ लोकांना पाहायला मिळते, तर चित्रपटात ती कथा तीन तासांत प्रेक्षकांसमोर मांडली जाते. मी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांनी मला खरी ओळख मिळवून दिली. मी छोट्या पडद्यावर काम करायचे म्हणून करीत नाही, तर मी छोट्या पडद्यावर काम करणे खूप एन्जॉय करतो.

नव्या मालिकेच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा आहे?
मी आतापर्यंत अनेक मालिका केल्या आहेत; पण या मालिकेच्या चित्रीकरणाचा वेगळाच अनुभव आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मला एक सुखद धक्का बसला. मालिकेच्या सेटवर सकाळी पोहोचल्यानंतर दिवसभरात तुम्हाला कोणकोणत्या दृश्यांचे चित्रीकरण करायचे आहे, त्यांची पटकथा प्रॉडक्शन टीममधील मंडळी तुमच्या हातात देतात. यामुळे एक कलाकार म्हणून तुम्हाला दिवसभर किती आणि काय काम करायचे आहे, याची कल्पना येते. चिन्मय एक निर्माता होण्याआधी एक अभिनेता असल्यामुळे एका कलाकारासाठी चांगले काय आहे, याचा तो सगळ्यात पहिल्यांदा विचार करतोय. या मालिकेच्या चित्रीकरणाला तर खूप मजा येतेय. कारण ही एक रहस्यमय मालिका असल्याने मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच लागलेली आहे.

Web Title: 'Small Screen Recognition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.