अभिनेत्यांनाही साडी-सलवारची क्रेझ

By Admin | Published: September 2, 2015 12:26 AM2015-09-02T00:26:41+5:302015-09-02T00:26:41+5:30

अष्टपैलू अभिनेत्यांना विविध प्रकारच्या भूमिका साकारताना स्त्री भूमिकाही करण्याचा मोह होतो. यामध्ये बहुतांश वेळा विनोदनिर्मिती हा भाग असतो.

Saadi-Salwar keg | अभिनेत्यांनाही साडी-सलवारची क्रेझ

अभिनेत्यांनाही साडी-सलवारची क्रेझ

googlenewsNext

अष्टपैलू अभिनेत्यांना विविध प्रकारच्या भूमिका साकारताना स्त्री भूमिकाही करण्याचा मोह होतो. यामध्ये बहुतांश वेळा विनोदनिर्मिती हा भाग असतो. पण वैभव मांगले एका स्त्री भूमिकेत येत असून पुरुषांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्न मांडणारी ही भूमिका आहे.
रुपेरी पडद्यावर अभिनेत्यांनी स्त्री भूमिका साकारणे नवे नाही. अगदी आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘सायको’सारख्या चित्रपटातील नायकही आपल्या आईचे कपडे घालतो. परंतु, मराठी असो की हिंदी चित्रपटसृष्टी यांनी अभिनेत्यांना स्त्री भूमिकेमध्ये दाखविताना विनोद निर्माण करणे हाच भाग ठेवला. आचार्य अत्रे यांच्या गाजलेल्या ‘मोरूची मावशी’ नाटकापासून हा प्रवास सुरू झाला. यातील राणीसाहेब साकारण्याचे आणि ‘आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा’ म्हणत नाचण्याचे आव्हान अनेक कलाकारांनी पेलले. यामध्ये विजय चव्हाण यांचे नाव अग्रभागी आहे.
मुलींच्या होस्टेलमध्ये जायचे असो की तिच्या घरच्यांपासून लपायचे असो, स्त्रीवेश धारण करण्यात आला आहे. अगदी शम्मी कपूरपासून हा प्रवास सुरू होतो. ऋषी कपूरनेही ‘रफूचक्कर’मध्ये मिनी स्कर्ट घातला होता. कमल हसनने ‘चाची ४२०’मध्ये केवळ विनोदीच नव्हे तर भावनिक नाते मांडणारी भूमिका केली होती. ‘आॅँटी नंबर १’मध्ये गोविंदा, ‘गोलमाल’मध्ये अजय देवगण, तुषार कपूर, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, ‘मिलेंगे मिलेंगे’मध्ये शाहीद कपूर यांनी स्त्री भूमिका केल्या. श्रेयस तळपदेने तर ‘पेइंग गेस्ट’मध्ये दुसऱ्यांदा स्त्री भूमिका केली. दबंग सलमान खानही ‘जानेमन’मध्ये स्त्री भूमिकेमध्ये दिसला. ‘अपना सपना मनी मनी’मध्ये तर रितेश देशमुखने चुडीदारवर वावरून धुमाकूळ घातला. मराठीमध्ये ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात तर सचिनने संध्या आणि सुधा या दोन गोड मुली साकारल्या होत्या. याच चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गावरान पार्वतीने धमाल केली. याबाबत वैभव मांगले म्हणतात, ‘मी साकारलेली भूमिका आजवरच्या कोणत्याही स्त्रीपार्टपेक्षा वेगळी असणार आहे़ त्यात विनोद नाही, तर त्याकडे खूप गंभीरपणे आणि एक आव्हान म्हणून पाहत आहे. आजवर वेगवेगळ्या नाटकांत, कार्यक्रमात स्त्री भूमिका केल्या आहेत़ त्या सर्व विनोदी ढंगाने होत्या़ आपण ‘वाडा चिरेबंदी’सारखे गंभीर नाटक करीत आहोत़ याशिवाय फू बाई फू, शेजारी शेजारी पक्के शेजारीसारख्या मालिका अथवा काकस्पर्श, शाळा, टाइमपाससारख्या चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाली़ पण त्यापेक्षाही ही एक वेगळी भूमिका आहे़ ही वेगळी भूमिकाच नाही तर आजवरच्या अभिनयातील कारकिर्दीला नवे वळण देणारी भूमिका असल्याचे वैभव म्हणतो़

या भूमिकेसाठी वैभवने गेल्या दोन महिन्यांत ६ किलो वजन कमी केले़ त्याविषयी तो म्हणतो, आजवर प्रामुख्याने वडिलांच्या भूमिका केल्याने दिसण्याकडे जरुरीपेक्षा अधिक महत्त्व दिले नाही़ पण या भूमिकेची मागणी वेगळी आहे़ त्यातील बाई ही बाई वाटली पाहिजे़ त्यासाठी वजन कमी करणे क्रमप्राप्त होते़ माझे खाण्यावर नियंत्रण असते़ मी नियमितपणे चालण्याचा व्यायाम करतो़ पण जीममध्ये कधी घाम गाळला नव्हता़ प्रथमच जीममध्ये वेगवेगळे व्यायाम प्रकार करून वजन घटविण्याचा प्रयत्न केला आहे़ तो स्त्री का बनतो, याचा हा प्रवास आहे़ कोणत्या परिस्थितीत तो स्त्रीरूप धारण करतो, याची ही कहाणी आहे़ ती एक गृहिणी आहे़ स्त्रीच्या व्यथा, समस्या, तिचे दु:ख एक पुरुष जेव्हा मांडतो, तेव्हा ते अधिक गहिरे होत जाते़ या भूमिकेसाठी मानसिक तयारी खूप करावी लागली़ त्यासाठी एका कवितासंग्रहाचा खूप उपयोग झाला़ त्यात स्त्री काय विचार करते़ कोणत्या बाबीवर ती कशी प्रतिक्रिया देते़ भारतीय संस्कृतीत ती कशी अडकली आहे़ हे वाचल्यावर मी हडबडून गेलो़ आजवर आपण स्त्रियांच्या मानसिकतेकडे लक्ष दिले नाही़ त्यातून स्त्रियांच्या भावभावनांचा अभ्यास करता आला़ ही भूमिका वेगवेगळ्या स्तरावर आपल्या मनाला भिडत जाते़ एका पुरुषाने स्त्रीचे दु:ख मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे़

Web Title: Saadi-Salwar keg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.