बेगम परवीन सुलताना-डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांची मैफल रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 12:32 PM2018-04-04T12:32:28+5:302018-04-04T18:27:10+5:30

मुंबईकरांना ‘स्त्री स्वर’ ही अनोखी अशी शास्त्रीय संगीत रजनी ऐकण्याचा योग येतो आहे. या संगीत रजनीमध्ये सर्व स्त्री कलाकार ...

Begum Parveen Sultana-Dr. Ashwini Bhide Deshpande plays a concert | बेगम परवीन सुलताना-डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांची मैफल रंगणार

बेगम परवीन सुलताना-डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांची मैफल रंगणार

googlenewsNext
ंबईकरांना ‘स्त्री स्वर’ ही अनोखी अशी शास्त्रीय संगीत रजनी ऐकण्याचा योग येतो आहे. या संगीत रजनीमध्ये सर्व स्त्री कलाकार सहभागी होत असून त्यांत बेगम परवीन सुलताना आणि डॉ अश्विनी भिडे देशपांडे या ज्येष्ठ कलाकारांबरोबरच युवा बासरीवादक देबोप्रिया चॅटर्जी यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १२ एप्रिल २०१८ रोजी वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. 
 
‘स्त्री स्वर’चे आयोजन महिलांचे सक्षमीकरण आणि होतकरू महिला संगीतकारांना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टाने केले जाते. बेगम परवीन सुलताना आणि डॉ अश्विनी भिडे देशपांडे या ख्यातकीर्त गायिकांनी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. देबोप्रिया चॅटर्जी या पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्य आणि ‘सखी’ नावाच्या सर्व महिला कलाकार असलेल्या सांगीतिक बँडमध्ये आघाडीच्या बासरीवादक आहेत. त्यांना कित्येक मानाचे पुरस्कार मिळाले असून त्यांत संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार, त्याशिवाय सुरमणी हा किताब आणि सहारा एक्सिलन्स अॅवॉर्ड्स आदी पुरस्कारांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सहभागी होवून देबोप्रिया यांना त्यांची सांगीतिक प्रतिभा संगीत रसिकांसमोर सादर करण्याची आणखी एक संधी प्राप्त झाली आहे.   

‘स्त्री स्वर’ संगीत कार्यक्रमाची सुरुवात देबोप्रिया चॅटर्जी यांच्या बासरीवादनाने होणार असून त्यांना प्रसाद पाध्ये तबल्यावर साथ देणार आहेत. त्यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या अतुलनीय प्रतिभेच्या गायिका डॉ अश्विनी भिडे देशपांडे यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर विश्वनाथ शिरोडकर आणि हार्मोनियमवर सीमा शिरोडकर साथ करणार आहेत. या गायकीच्या त्या एक आघाडीच्या गायिका तर आहेतच पण डॉ अश्विनी भिडे देशपांडे या मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवीधर आहेत आणि त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट केली आहे. संगीताचा वारसा असलेल्या घरात जन्मलेल्या डॉ अश्विनी यांना आत्तापर्यंत अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. त्यांत संगीत नाटक अकादमी पुरस्काराचा समावेश आहे.

‘स्त्री स्वर’ संगीत कार्यक्रमाची सांगता पतियाळा घराण्याच्या प्रख्यात गायिका आणि पद्मभूषण व संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या कलाकार बेगम परवीन सुलताना यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना तबल्यावर पंडित मुकुंदराज देव, हार्मोनियमवर पंडित श्रीनिवास आचार्य, तानपुऱ्यावर व गायनात शादाब एस खान साथ देणार आहेत. लहानपानापासूनच आपल्या अंगभूत गायकीने प्रसिद्धी मिळविलेल्या बेगम परवीन सुलताना यांना सुरुवातीचे प्रशिक्षण उस्ताद इक्रमुल मजीद यांच्याकडून मिळाले होते. त्यानंतर, त्यांनी त्यांचे गुरु उस्ताद मोहम्मद दिलशाद खान यांच्याकडे शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या गायकीला एक वेगळे आयाम प्राप्त केले होते. राग आणि आवाजाची पट्टी यांना वेगळी ऊंची प्राप्त करून देत त्यांनी हे स्थान प्राप्त केले होते. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त केलेल्या बेगम परवीन सुलताना यांना ‘क्वीन ऑफ हिंदुस्तानी म्युझिक’ म्हटले जाते. ‘पोयटेस ऑफ म्युझिक’ आणि ‘द अल्टीमेट सोप्रानो’ अशा बिरुदांनीही गौरविले जाते.

संयोजकांचा भर हा नेहमीच प्रत्येक कार्यक्रम वेगळ्या अर्थाने भारून टाकण्यावर, त्या कार्यक्रमाला वेगळी ओळख आणि दृष्टी देण्यावर असतो. त्यातून सर्वांगीण असे मनोरंजन देणे आणि हे सर्व खऱ्याअर्थी व्यावसायिक पद्धतीने करणे की जेणेकरून लोकांना त्याचा लाभ मिळेल यावर सर्व भर असतो. त्या माध्यमातून देशातील संगीताचा ऊंची वारसा लोकांसमोर येतो आणि जपला जातो.

Web Title: Begum Parveen Sultana-Dr. Ashwini Bhide Deshpande plays a concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.