कोलंबो : टीम इंडियातील सहका-यांमुळेच सध्याच्या संघाचे नेतृत्व करणे अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगून क्षमतेनुसार योगदान देण्याची सर्वच खेळाडूंमध्ये भूक आहे. यामुळे माझेही काम सोपे झाले, असे कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेत चौथ्या सामन्यात श्रीलंकेवर १६८ धावांनी विजय नोंदविल्यानंतर बीसीसीआय टीव्हीवरील चर्चेत विराट म्हणाला,‘सध्याचा संघ अप्रतिम असून अशा संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी ‘विशेष’ आहे. ड्रेसिंग रुममधील माहोल आणि खेळाडूंमधील एकोपा ही आमच्या जमेची बाजू असून सर्वच खेळाडूंमध्ये काही करण्याची जिद्द आहे. एक-दोन सामन्यात नव्हे तर ओळीने कामगिरीचा ग्राफ उंचाविण्याची भूक सहकाºयांमध्ये वाढीस लागल्यामुळे माझे काम सोपे झाले. अनेक संदर्भात सध्याचा संघ ‘विशेष’ ठरतो. मला केवळ क्षेत्ररक्षण सजवावे लागते. उरलेले काम खेळाडू स्वत: करतात.’
कोहलीच्या सुरात सूर मिळवित रोहित शर्मा म्हणाला,‘या संघाची जर कुठली ओळख असेल तर ती म्हणजे जो खेळाडू मैदानात उतरतो जो संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. स्वत:चे काम कसे चोख होईल, याची काळजी घेतो.’
कोहलीने चौथ्या सामन्यात ९६ चेंडूत १७ चौकार आणि दोन षटकारांसह १३१ तर रोहितने १०४ धावा ठोकल्या. या दोघांनी दुसºया गड्यासाठी २१९ धावांची भागीदारी करताच भारताने ५ बाद ३७५ धावांचा डोंगर उभारला. नंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने लंकेचा ४२.४ षटकांत २०७ धावांत धुव्वा उडविला. (वृत्तसंस्था)