निदाहास चषक : टीम इंडियाचा शानदार विजय, श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव

मनीष पांड्ये (४२*) आणि दिनेश कार्तिक (३९*) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिरंगी टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव केला. या शानदार विजयासह भारताने गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 11:48 PM2018-03-12T23:48:55+5:302018-03-12T23:48:55+5:30

whatsapp join usJoin us
Team India beat England by six wickets | निदाहास चषक : टीम इंडियाचा शानदार विजय, श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव

निदाहास चषक : टीम इंडियाचा शानदार विजय, श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : मनीष पांड्ये (४२*) आणि दिनेश कार्तिक (३९*) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिरंगी टी-२० मालिकेत श्रीलंकेचा ६ बळींनी पराभव केला. या शानदार विजयासह भारताने गुणतालिकेत ४ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. लंकेने दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १७.३ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १५३ धावा केल्या. 
पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी १९ षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. शार्दुल ठाकूरने कारकिर्दीतील सर्वोत्तम मारा करताना २७ धावांत ४ बळी घेत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. परंतु, सलामीवीर कुसल मेंडिसने ३८ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांचा तडाखा दिल्याने लंकेने १९ षटकात ९ बाद १५२ धावांची समाधानकारक मजल मारली. 
या अवाक्यातील धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. ७ चेंडूत एक चौकार व एक षटकार ठोकत त्याने ११ धावा केल्या. आक्रमक सुरुवात केल्यानंतर रोहित अकिला धनंजयच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर लगेच फॉर्ममध्ये असलेला शिखर धवनही (८) बाद झाला. यावेळी अनुभवी सुरेश रैना आणि लोकेश राहुल यांनी भारताला सावरले. रैना मोठी खेळी करणार असे दिसत असतानाच नुवान प्रदीपने त्याला बाद केले. रैनाने १५ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह २७ धावा काढत भारतीय धावसंख्येला वेग देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर जम बसलेला राहुल १७ चेंडूत १८ धावा काढून स्वयंचित झाला. 
यावेळी, भरतीय संघ कमालीचा दडपणाखाली आला. यजमान संघ मिळालेली संधी साधत बाजी मारणार असे दिसत होते. परंतु, मनिष पांड्ये आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांनी ६८ धावांची निर्णायक भागीदारी करुन भारताला विजयी केले. मनिषने ३१ चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ४२ धावा केल्या. कार्तिकने २५ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ३९ धावा काढल्या.
तत्पूर्वी कुसल मेंडिसच्या जोरावर एकवेळ दहाच्या सरासरीने फटकेबाजी करणारे यजमान दोनशेची मजल मारणार अशी शक्यता होती. परंतु, भारतीय गोलंदाजांनी वेळीच नियंत्रण मिळवताना यजमानांची आगेकूच रोखली. शार्दुल ठाकूरने ४ बळी घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. मेंडिसने सुरुवातीपासून हल्ला करताना आपला इरादा स्पष्ट केला. दानुष्का गुणथिलाका (१७) आणि कुसल परेरा (३) यांना पाठोपाठच्या षटकात बाद करुन भारताने यजमांनाची २ बाद ३४ अशी कोंडी केली. परंतु, मेंडिसने कोणतेही दडपण न घेता शानदार फटकेबाजी केली. अनुभवी उपुल थरंगाने २४ चेंडूत २२ धावा करुन त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसºया बळीसाठी ६२ धावांची वेगवान भागीदारी करुन लंकेला सुस्थितीत आणले. 
यावेळी लंका द्विशतकी मजल मारणार अशीच शक्यता होती. मात्र, विजय शंकरने थरंगाला बाद करुन ही जोडी फोडली आणि लंकेच्या फलंदाजीला गळती लागली. यानंतर ठराविक अंतराने बळी गेल्याने यजमानांना अपेक्षित मजल मारता आली नाही. मेंडिसने ३८ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह शानदार ५५ धावा केल्या. थिसारा परेरा (१५) आणि दासुन शनाका (१९) यांच्यामुळे लंकेने दिडशेचा पल्ला पार केला. भारताकडून शार्दुल ठाकूरने २७ धावांत ४ तर वॉशिंग्टन सुंदरने २ बळी घेतले.

धावफलक : 
श्रीलंका : दानुष्का गुणथिलका झे. रैना गो. शार्दुल १७, कुसल मेंडिस झे. रोहित गो. चहल ५५, कुसल परेरा त्रि. गो. सुंदर ३, उपुल थरंगा त्रि. गो. शंकर २२, थिसारा परेरा झे. चहल गो. शार्दुल १५, जीवन मेंडिस त्रि. गो. सुंदर १, दासुन शनाका झे. कार्तिक गो. शार्दुल १९, अकिला धनंजय झे. राहुल गो. उनाडकट ५, सुरंगा लकमल नाबाद ५, दुष्मंता चमीरा झे. उनाडकट गो. शार्दुल ५, नुवान प्रदीप नाबाद ०. अवांतर - १०. एकूण : १९ षटकात ९ बाद १५२ धावा. 

गोलंदाजी : जयदेव उनाडकट ३-०-३३-१; वॉशिंग्टन सुंदर ४-०-२१-२; शार्दुल ठाकूर ४-०-२७-४; युझवेंद्र चहल ४-०-३४-१; विजय शंकर ३-०-३०-१; सुरेश रैना १-०-६-०. 

भारत : रोहित शर्मा झे. मेंडिस गो. धनंजय ११, शिखर धवन झे. परेरा गो. धनंजय ८, लोकेश राहुल स्वयंचीत १८, सुरेश रैना झे. परेरा गो. प्रदीप २७, मनिष पांड्ये नाबाद ४२, दिनेश कार्तिक नाबाद ३९. अवांतर - ८. एकूण : १७.३ षटकात १५३ धावा.

गोलंदाजी : सुरंगा लकमल २-०-१९-०; अकिला धनंजय ४-०-१९-२; दुष्मंता चमीरा ३-०-३३-०; नुवान प्रदीप २.३-०-३०-१; जीवन मेंडिस ४-०-२४-१; थिसारा परेरा २-०-१७-०.

Web Title: Team India beat England by six wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.