हैदराबाद : निर्णायक ठरणारा तिसरा टी२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आल्याने भारत - आॅस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. पावसामुळे मैदानावर पाणी साचल्याने एकही चेंडूचा खेळ झाला नाही. संपूर्ण मैदान ओले राहिल्याने भारतीय कर्णधार विराट कोहली, आॅस्ट्रेलियन कर्णधार डेव्हीड वॉर्नर, पंच आणि सामनाधिकारी यांनी संयुक्तपणे खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पंचांनी या सामन्याविषयी सांगितले की, ‘मैदान इतके ओले होते की, गेल्या काही तासांपासून पाऊस थांबल्यानंतरही खेळ होण्याची शक्यता नव्हती.’ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित या सामन्याला होत असलेल्या विलंबामुळे पंचांनी मैदानात तीन वेळा पाहणी केली. परंतु, मैदान कर्मचाºयांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतरही सामना खेळविण्यात अपयश आले. हैदराबाद येथे गेल्या एक आठवड्याहून अधिक काळापासून पाऊस होत असून हवामना खात्याने शुक्रवारीही पावसाची शक्यता वर्तवली होती.
टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र, तो सामना भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ९ विकेट्सने जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. त्याचवेळी, दुसरा सामना फलंदाजांच्या हाराकिरीमुळे गमवावा लागल्याने भारताने मालिका विजयाची सुवर्णसंधीही गमावली. त्या सामन्यात आॅस्टेÑलियाने ८ विकेट्सने दणदणीत बाजी मारत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती. (वृत्तसंस्था)