मुंबई - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या करिअरमधील अनेक गोष्टींचा ‘द जर्नी’ पुस्तकातून खुलासा केला आहे. पुस्तकातून स्टीव्ह स्मिथने आपली कर्णधारपदी निवड कशी झाली याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. कशाप्रकारे पबमध्ये दारु पिताना आपल्या कर्णधार बनवण्याची पार्श्वभुमी तयार झाली याचा स्टीव्ह स्मिथने खुलासा केला आहे. 2014 मधअये स्टीव्ह स्मिथची कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली. स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार ठरला. 

जेव्हा मायकल क्लार्क जखमी झाला होता, तेव्हा उपकर्णधार ब्रॅड हॅडिनच्या जागी स्टीव्ह स्मिथची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांची शिफारस मंजूर केल्यानंतर स्टीव्ह स्मिथचं कर्णधारपदी प्रमोशन केलं होतं. 

अॅडिलेड ओव्हलमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात मायकल क्लार्क जखमी झाला होता. या सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथ, ब्रॅड हॅडिन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे बोर्ड सदस्य मार्क टेलर एकत्र दारु पिण्यासाठी बसले होते. यावेळी स्टीव्ह स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी ब्रॅड हॅडिनकडे सोपवली गेली पाहिजे असं मत व्यक्त केलं. मार्क टेलर यांनीदेखील स्टीव्ह स्मिथला दुजोरा दिला. पण ब्रॅड हॅडिनने नकार देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भविष्याकडे पाहिलं पाहिजे असं सांगत, स्टीव्ह स्मिथला कर्णधार केलं गेलं पाहिजे असं सांगितलं. पुस्तकात सांगण्यात आल्यानुसार, ब्रॅड हॅडिनचं मत ऐकल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्ट टेलर आश्चर्यचकित झाले होते. 

यावेळी मार्क टेलर यांनी स्मितहास्य देत ब्रॅड हॅडिनला विचारलं की, 'तर तुला कर्णधार व्हायचं नाही आहे ?'. स्मिथने पुस्तकात लिहिलं आहे की, सुरुवातील मला ही सगळी मस्करी वाटली. 

मार्क टेलरने यानंतर स्मिथला 'तू तयार आहेस का ?' विचारलं. स्मिथने लिहिलं आहे की, 'मी तयार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती, आणि हेच मी मार्क टेलर यांना सांगितलं'. यानंतर मार्क यांनी 'मी काही फोन करुन येतो' असं सांगत बाहेर गेले. 

दुस-या दिवशी सकाळी मार्शने स्टीव्ह स्मिथला फोन करुन सांगितलं की, कर्णधार बनवण्याची प्रक्रिया जोराने सुरु झाली असून, तू ऑस्ट्रेलिया 45 वा कसोटी कर्णधार होणार आहेस. पुढच्या आठवड्यात मार्क टेलर यांनी स्टीव्ह स्मिथला कर्णधाराचा ब्लेजर दिला. यानंतर स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला होता. स्मिथने कर्णधारपद सोपवल्यानंतर पहिल्याच तीन सामन्यातं शतक ठोकलं होतं.