कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, आयसीसीच्या वन डे, कसोटी संघाचे कर्णधारपद

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 10:53 AM2019-01-22T10:53:09+5:302019-01-22T11:15:55+5:30

whatsapp join usJoin us
Indian captain Virat Kohli has been named to lead ICC's ODI Team of the Year | कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, आयसीसीच्या वन डे, कसोटी संघाचे कर्णधारपद

कॅप्टन कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, आयसीसीच्या वन डे, कसोटी संघाचे कर्णधारपद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देवन डे संघात विराटसह रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा व कुलदीप यादवला संधीकसोटी संघात विराटसह रिषभ पंत व जसप्रीत बुमरारिषभ पंत उदयोन्मुख खेळाडू म्हणून जाहीर

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी 2018 या वर्षाचा वन डे व कसोटी संघ जाहीर केला आणि त्या संघांचे नेतृत्व कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. वन डे संघात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंचे वर्चस्व जाणवत आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या संघात इंग्लड व भारताचे प्रत्येकी चार खेळाडू आहेत. कसोटी संघात भारतासह न्यूझीलंडच्या खेळाडूंचा दबदबा जाणवत आहे.


आयसीसीच्या वन डे क्रमवारीत इंग्लंड व भारत हे संघ अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे 2018च्या संघात त्यांचे वर्चस्व असणे साहजिकच होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2018मध्ये 14पैकी 9 सामने जिंकले आहेत. इंग्लंडसाठीही 2018 हे वर्ष विशेष राहिले. त्यांनी 24पैकी 17 सामन्यांत विजय मिळवले आहेत. या संघात न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंनीही स्थान पटकावले आहे. 
 

भारताचे शिलेदार...
विराट कोहली
विराट कोहलीने 2018 मध्ये अनेक विक्रम मोडले. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 10000 धावांचा विक्रम कोहलीने स्वतःच्या नावावर केला. कोहलीने 2018 मध्ये 14 सामन्यांत 102.55च्या सरासरीने 1202 धावा केल्या. त्यात 6 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 


रोहित शर्मा 
सलामीवीर रोहित शर्मा हा कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 19 डावांत 73.57च्या सरासरीने 1030 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेड हा 100.09 इतका होता. त्याने 2018मध्ये 5 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक उंचावला होता. 


कुलदीप यादव
कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या तालावर भल्याभल्या फलंदाजांना नाचवले आहे. त्याने 19 सामन्यांत 17.77च्या सरासरीने धावा देताना 45 विकेट्स घेतल्या. त्याने इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेत आपला दबदबा दाखवला. 


जसप्रीत बुमरा
भारताच्या जलद माऱ्याचा प्रमुख अस्त्र जसप्रीत बुमरासाठी 2018 हे वर्ष खूप विशेष राहिले आहे. त्याने 13 डावांत 22 विकेट्स घेतल्या आहेत. 


वन डे पाठोपाठ कसोटी संघाचे नेतृत्वही कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. आयसीसीच्या कसोटी संघात भारत आणि न्यूझीलंड या संघांतील प्रत्येकी तीन खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला नमवण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला. आयसीसीच्या कसोटी संघात कोहलीसह जसप्रीत बुमरा व रिषभ पंत यांनी स्थान पटकावले आहे.

ICC चा कसोटी संघ ( फलंदाजीच्या क्रमानुसार)
टॉम लॅथम ( न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्ने ( श्रीलंका), केन विलियम्सन ( न्यूझीलंड), विराट कोहली ( भारत, कर्णधार), हेन्री निकोल्स ( न्यूझीलंड), रिषभ पंत ( भारत, यष्टिरक्षक), जेसन होल्डर ( वेस्ट इंडिज), कागिसो रबाडा ( दक्षिण आफ्रिका), नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बुमराह ( भारत), मोहम्मद अब्बास ( पाकिस्तान). 
 

ICC चा वन डे संघ ( फलंदाजीच्या क्रमानुसार)
रोहित शर्मा ( भारत), जॉनी बेअरस्टो ( इंग्लंड), विराट कोहली ( भारत, कर्णधार), जो रूट ( इंग्लंड), रॉस टेलर ( न्यूझीलंड), जोस बटलर ( इंग्लंड, यष्टिरक्षक), बेन स्टोक्स ( इंग्लंड), मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश), रशिद खान ( अफगाणिस्तान), कुलदीप यादव ( भारत), जसप्रीत बुमराह ( भारत).  

Web Title: Indian captain Virat Kohli has been named to lead ICC's ODI Team of the Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.