चेन्नई, आयपीएल 2019 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ताप आल्यामुळे खेळला नव्हता. या सामन्यात चेन्नईला धोनीची उणीव प्रकर्षाने जाणवली. 155 धावांचे माफक लक्ष्यही चेन्नईच्या संघाला पार करता आलेले नाही. चेन्नईचे दिग्गज फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले. मुंबई इंडियन्सने हा सामना 46 धावांनी जिंकला. या सामन्यातील धोनीच्या अनुपस्थितीबाबत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मा आमि इव्हान लुईस यांनी संयमी खेळ करताना अनुक्रमे 67 व 32 धावा केल्या. त्यांच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने 4 बाद 155 धावा केल्या. हार्दिक पांड्याने नाबाद 23 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात चेन्नईकडून मुरली विजय ( 38) आणि मिचेल सँटनर (22) हे वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. लसिथ मलिंगाने सर्वाधिक चार विकेट घेत चेन्नईला धक्के दिले. त्याल जसप्रीत बुमराह व कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्तम साथ दिली.
या सामन्यानंतर रोहित म्हणाला,''महेंद्रसिंग धोनीची अनुपस्थिती हा आम्हाला मोठा दिलासा होता आणि त्यामुळे आमचे मनोबल उंचावले. धोनीचे संघात असणे हेच खूप असते. धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करू शकत नाही. ते चाचपडतात. त्यामुळे नाणेफेक गमावणे हे आमच्यासाठी बरेच झाले. संघातील खेळाडूंनी त्यांची भूमिका चोख बजावली.''