हैदराबाद, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलच्या 12 व्या हंगामाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण जिंकेल, याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात चेन्नईला तीनही सामन्यांत पराभूत केले आहे, परंतु महेंद्रसिंग धोनीसारखा चतुर कर्णधार लाभलेला चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात धक्का देण्याची क्षमता राखतो. त्यामुळे त्यांना रोखावं कसं याचा गेम प्लान मुंबईच्या चाहत्यांनी तयार केला आणि नेमका तो चेन्नईच्या हाती लागला.
![]()
या गेम प्लानमध्ये चाहत्याने मुंबईला सहा गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा सल्ला दिला आहे. यासह त्याने असे आठ प्लान मुंबईसाठी तयार केले आहेत. CSKनं हा गेम प्लान रिट्विट करून तो संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना टॅग केला आहे.
मुंबई इंडियन्स आमि
चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएलच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा समोरासमोर येणार आहेत. चेन्नईने 2010 मध्ये मुंबईच्या डी वाय पाटिल स्टेडियमवर मुंबईला 22 धावांनी नमवून जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईने कोलकाताच्या इडन गार्डन्सवर चेन्नईचा 23 धावांनी, तर 2015 मध्ये कोलकातावरच चेन्नईचा 41 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता चेन्नईविरुद्ध मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करतो की चेन्नई जेतेपदाच्या शर्यतीत बरोबरी करतो याची उत्सुकता आहे.
![]()
चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे. रोहितने आयपीएलच्या अंतिम सामन्यात एकदाही पराभव पत्करलेला नाही. त्याने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून आणि 2013, 2015 व 2017 मध्ये मुंबई इंडियन्सकडून जेतेपदाचा चषक उंचावला आहे.