मुंबई - डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आवड्यासांठी संघाबाहेर झाल्याने भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील मोहिमेला जबरदस्त धक्का बसला आहे. धवनच्या अनुपस्थितीमध्ये आगामी लढतीत लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. मात्र डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे धवन संपूर्ण विश्वचषक स्पर्धेला मुकू शकतो. त्यामुळे धवनला पर्याय म्हणून युवा फलंदाज ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि अंबाती रायुडू यांची नावे आघाडीवर आहेत.
शिखर धवनच्या अनुपस्थितीत युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याला संघात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येईल. तर ऋषभ पंत खालच्या फळीत फलंदाजीला येऊ शकतो. ऋषभ पंतला विश्वचषक संघात स्थान न मिळणे हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
![]()
ऋषभ पंतसोबतच श्रेयस अय्यरचे नावही चर्चेत आहे. श्रेयसने यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व केले होते. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने 16 सामन्यांत 463 धावा कुटल्या होत्या. त्यामध्ये तीन अर्धशतकांचाही समावेश होता. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यासोबत अनुभवी अंबाती रायुडू याचेही नाव चर्चेत आहे. मात्र गेल्या काही काळात रायुडूची कामगिरी अपेक्षेनुरूप झालेली नाही. मात्र अनुभवाचा फायदा त्याला मिळू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान नाथन कुल्टर-नीलचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. दरम्यान, आज हाताचा स्कॅन केल्यानंतर शिखरच्या हालाता झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिखर धवनला पुढील तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.