ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान हे संघ 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेवटचे भिडले होते. त्यात पाकिस्तानने बाजी मारली होती.
मुंबई - भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये क्रिकेटचा सामना म्हणजे दोन्ही देशांमध्ये बँक हॉलीडेच. शेजारील देशांमधील राजकीय तणाव मैदानावरही पाहायला मिळतो. त्यामुळे यांच्यातील सामन्याला प्रचंड महत्त्व प्राप्त होते. Asia Cup 2018च्या क्रिकेट स्पर्धेत हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. मात्र, या लढतीत थकलेला भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या आशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 सप्टेंबरला सामना होणार आहे. मात्र, भारताला या लढतीपूर्वी विश्रांतीसाठी वेळ दिलेला नाही. भारतीय संघाला 18 व 19 सप्टेंबर असे सलग दोन दिवस सामने खेळावे लागणार आहेत, तर पाकिस्तानला 16 सप्टेंबरनंतर थेट दोन दिवसांची विश्रांती घेऊन भारताचा सामना करायचा आहे.
दुबईत 15 ते 28 सप्टेंबर या कालावधीत होणा-या स्पर्धेचा पहिला सामना बांगलादेश विरूद्ध श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून एक संघ मुख्य फेरीत येणार आहे आणि त्याचा रकाणा रिक्त ठेवण्यात आला आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी सहभाग निश्चित केला आहे. संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हाँगकाँग यांच्यापैकी एक संघ मुख्य फेरीत प्रवेश करणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे संघ 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेवटचे भिडले होते. त्यात पाकिस्तानने बाजी मारली होती.