Asia Cup 2018- भारताने बांगलादेशला 7 गड्यांनी लोळवले; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

गोलंदाजांच्या नियंत्रित मा-यानंतर कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या सलग दुस-या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशला ‘सुपर फोर’ फेरीत ७ गड्यांनी सहज लोळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 11:49 PM2018-09-21T23:49:21+5:302018-09-22T00:28:58+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018 - India beat Bangladesh by 7 wickets | Asia Cup 2018- भारताने बांगलादेशला 7 गड्यांनी लोळवले; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

Asia Cup 2018- भारताने बांगलादेशला 7 गड्यांनी लोळवले; रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : गोलंदाजांच्या नियंत्रित मा-यानंतर कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या सलग दुस-या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशला ‘सुपर फोर’ फेरीत ७ गड्यांनी सहज लोळवले. प्रथम फलंदाजी करणा-या बांगलादेशला ४९.१ षटकात १७३ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने ३६.२ षटकात ३ बाद १७४ धावा केल्या. रोहितने १०४ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या. त्याआधी रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. 
रोहितने सावध परंतु दमदार अर्धशतक झळकावत भारताच्या विजयावर शिक्का मारला. सलामीवीर शिखर धवनने ४७ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ४० धावा केल्या. रोहित - धवन यांनी ६१ धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. धवन, अंबाती रायुडू (१३) बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने वरच्या स्थानी येत ३७ चेंडूत ३ चौकारांसह ३३ धावा काढल्या. गेल्या काही सामन्यांपासून झगडत असलेला धोनी फॉर्ममध्ये आल्याने भारताच्या फलंदाजीला बळकटी आली. 
तत्पूर्वी, भुवनेश्वर - बुमराह यांनी बांगलादेशला सुरुवातीला धक्के देत त्यांची ६व्या षटकात २ बाद १६ अशी अवस्था केली. पुनरागमन केलेल्या जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडताना त्यांची मधली फळी कापून काढली. त्याने शाकिब अल हसन (१७), मुस्तफिकूर रहिम (२१), मोहम्मद मिथुन (९) व मोसद्दक हुसैन (१२)  यांना बाद केले.  तसेच भुवी - बुमराह यांचा मारा सुरु असल्याने बांगलादेशची ३४व्या षटकात ७ बाद १०१ अशी अवस्था झाली.
मेहदी हसन मिराझने ५० चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा केल्याने बांगलादेशला दीडशेचा पल्ला पार करण्यात यश आले. कर्णधार मुशरफी मोर्ताझासह (२६) त्याने ६६ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. भुवनेश्वरने मोर्ताझाला बाद करुन ही जोडी फोडल्यानंतर बांगलादेशचा डाव झटपट गुंडाळला गेला. जडेजाने १० षटकात २९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी, तर भुवनेश्वर व बुमराहने प्रत्येकी ३ बळी घेतले. 
------------------------
जडेजाचा ४ वर्षांनी पराक्रम
जडेजाने शानदार पुनरागमन करताना या सामन्यात ४ महत्त्वपूर्ण बळी मिळवले. विशेष म्हणजे त्याने चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकदिवसीय सामन्यात ३ पेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. जडेजा ६ जुलै २०१७ मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने ११ आॅक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध ४४ धावांत ३ बळी घेतले होते. त्यानंतर जडेजाने सर्वोत्तम कामगिरी करताना बांगलादेशविरुद्ध  १० षटकांत २९ धावांत ४ बळी घेतले.
-------------------------------
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : ४९.१ षटकात सर्वबाद १७३ धावा (मेहदी हसन मिराझ ४२, मशरफी मोर्ताझा २६, महमुद्दुल्लाह २५; रविंद्र जडेजा ४/२९, भुवनेश्वर कुमार ३/३२, जसप्रीत बुमराह ३/३७.) पराभूत वि. भारत : ३६.२ षटकात ३ बाद १७४ धावा. (रोहित शर्मा नाबाद ८३, शिखर धवन ४०, महेंद्रसिंग धोनी ३३; रुबेल हुसैन १/२१, मशरफी मोर्ताझा १/३०, शाकिब अल हसन १/४४.)

Web Title: Asia Cup 2018 - India beat Bangladesh by 7 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.