दुबई : स्टार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत शनिवारपासून सुरू होत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची चमक काहीशी कमी झाली असली तरी तब्बल १५ महिन्यानंतर आमने-सामने उभे ठाकणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये १९ तारखेला खेळल्या जाणाऱ्या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आज बांगलादेश आणि श्रीलंका सलामीला खेळणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून यूएई हे पाकचे होमग्राऊंड बनल्यामुळे भारताच्या तुलनेत पाक संघाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असेल यात शंका नाही. स्पर्धेत दोन्ही संघांदरम्यान दोन सामने निश्चित आहेत, पण उभय संघांनी अंतिम फेरी गाठली तर तिसºयांदा एकमेकांविरुद्ध खेळावे लागेल.
साखळीत पहिला सामना १९ ला झाल्यानंतर सुपर फोरमध्ये आणखी एक सामना होईल. याशिवाय २८ तारखेला अंतिम सामनादेखील उभय संघांमध्ये अपेक्षित आहे. भारताला हाँगकाँगविरुद्ध १८ तारखेला सलामीचा सामना खेळायचा असून दुसºया दिवशी पाकविरुद्ध लढत होईल.
आशिया चषकांत सहा संघाचा सहभाग असला तरी भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उभय संघात अखेरचा सामना चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान झाला होता. त्यात पाकने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता. १९ तारखेला होणाºया सामन्यात भारत पाकचा पराभव करीत परतफेड करण्यास उत्सुक असेल.
भारतीय संघाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे बीसीसीआयने आशिया चषकासाठी नियमित कर्णधार विराट कोहलीला आराम दिला आहे. विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी संघात सहभागी आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले. रोहितकडे आयपीएलचा अनुभव आहे. संघात अनुभवी महेंद्रसिंग धोनीही असेल. काही नव्या चेहºयांना देखील संधी देण्यात आली आहे.
२०१६ मध्ये आशिया चषक टी-२० पद्धतीने खेळवला होता. पण यावर्षी पुन्हा वन डे पद्धतीने होणार आहे. यंदा तीन संघाचे दोन ग्रुप असून भारत ब गटात पाकिस्तान आणि हाँगहाँगसोबत तर अ गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहे. साखळीनंतर सर्वोतम चार संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर फोरमधील सर्वोत्कृष्ट दोन संघ अंतिम सामना खेळतील. भारतीय फलंदाज पाकचा मारा कसे खेळतील, याबद्दलही उत्कंठा आहे.
भारताचे पारडे जड...
या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या अखेरच्या दहा सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा वेळा पराभव केला. आशिया चषकांत भारताने ४३ सामने खेळले. त्यातील २६ जिंकले आणि १६ सामने गमावले. पाकिस्तान संघाने आशिया चषकात ४० पैकी २४ सामन्यात विजय मिळविला असून १५ सामने गमविले. भारत आणि पाकिस्तानची आशिया चषकातील विजयाची सरासरी सारखीच आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांचा १२ वेळा आमना-सामना झाला. भारताने सहा वेळा बाजी मारली तर पाकने पाच सामने जिंकले. एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
आशिया चषकात खेळणारे संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अम्बाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (उपकर्णधार), हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दिनेश कार्तिक आणि खलील अहमद.
पाकिस्तान : सर्फराज अहमद (कर्णधार आणि यष्टिरक्षक), फखर जमा, शान मसूद, बाबर आजम, हॅरिस सोहेल, इमाम उल हक, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, मोहम्मद आमिर, शोएब मलिक, जुनेद खान, उस्मान खान आणि शाहीन अफ्रिदी.
बांगलादेश : मशरफी मुर्तजा (कर्णधार), तमिम इक्बाल, लिटन कुमार दास, मुश्फिकर रहीम (यष्टिरक्षक), महमूदुल्लाह रियाद, मोमिनूल हक, अरिफुल हक, मोहम्मद मिथून, मुस्तफिजूर रहमान, रूबेल हुसेन, मेहदी हसन मिराज, मोसादेक हुसेन, नजमूल इस्लाम, नजमूल हुसेन शांतो आणि अबू हिदर रोनी.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुसाल परेरा, कुसाल मेंडिस, उपुल थरंगा, तिसारा परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, दासून शनाका, कासून रजीता, अकिला धनंजय, अमिला अपोंसो, लसिथ मलिंगा, दुष्मंत चामीरा, दिलरूवान परेरा, शेहान जयसूर्या.
अफगाणिस्तान : असगर अफगान (कर्णधार), मोहम्मद शहजाद, इहसानुल्लाह जनत, हसमतुल्लाह शाहिदी, नजीबुल्लाह जदरान, मुनीर अहमद, जावेद अहमदी, मोहम्मद नबी, रहमत शाह, गुलबदन नायब, समिउल्लाह शेनवारी, शराफुद्दीन अशरफ, राशिद खान, मुजीब जदरान, आफताब आलम, यास्मीन अहमदजई आणि सय्यद शिरजाद.
हाँगकाँग : अंशुमन रथ (कर्णधार), एजाज खान, बाबर हयात, कॅमेरून मॅकॉल्सन, क्रिस्टोफर कार्टर, अहसन खान, अहसन नवाज, अर्शद मोहम्मद, किनचिट शाह, नदीम अहमद, राग कपूर, स्कॉट मॅकहनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफजल, वकास खान आणि आफताब हुसेन.