नवी दिल्ली - आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा भारताचा डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा याने निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याविषयी भाष्य केले आहे. महेंद्र सिंग धोनी हा बऱ्यापैकी शांत आणि संयमी कर्णधार होता तर विराट कोहली सळसळत्या रक्ताचा आणि आक्रमक कर्णधार आहे, असे नेहराने म्हटले आहे. 
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आशिष नेहराने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या कप्तानीविषयी आपले मत मांडले. नेहरा म्हणाला," धोनी आणि विराट कोहलीचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे भिन्न आहे. महेंद्र सिंग धोनी हा बऱ्यापैकी शांत आणि संयमी आहे तर विराट कोहली आक्रमक कर्णधार आहे. धोनीने खेळाडू आणि कर्णधार म्हणून खूप चांगली कामगिरी बजावली आहे. तसेच त्याने योग्यवेळी विराटकडे कर्णधारपद सोपवले आहे."
यावेळी आपल्या निवृत्तीच्या निर्णयावरही नेहराने प्रतिक्रिया दिली. निवृत्तीबाबत आशिष तो म्हणतो," निवृत्तीचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण मी हा निर्णय एका रात्रीत घेतलेला नाही. मी निवृत्तीसाठी योग्य वेळेची वाट पाहिली. आज भारतीय क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित हातांमध्ये आहे. " 1 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 लढतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्या लढतीत भारतीय संघाने न्यूझीलंडवर मात करत नेहराला दिल्लीच्या घरच्या मैदानात संस्मरणीय निरोप दिला होता. 
आशिष नेहराने अखेरचा कसोटी सामना एप्रिल २००४मध्ये, तर अखेरचा वन-डे विश्वकप २०११मध्ये खेळला होता.पण तो आयपीएल व अन्य स्पर्धांमध्ये नियमितपणे खेळतो. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही करत होता. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ट्वेंटी-20 मालिकेत आशिष नेहराला भारतीय संघात असूनही अंतिम संघात स्थान देण्यात आले  नव्हते. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळताच नेहराने निवृत्तीची घोषणा केली होती. 
२००९ मध्ये भारताकडून श्रीलंकेविरोधात टी-२०त पदार्पण करणारा नेहरा आज आश्विन आणि बुमराहनंतर सर्वाधिक बळी मिळवणारा भारताचा तिसरा गोलंदाज आहे. त्याने २७ टी-२० सामन्यांत ३४ बळी मिळवले आहेत.  नेहराने १७ कसोटी सामन्यात ४४, तर १२० एकदिवसीय सामन्यांत १५७ गडी बाद केले आहेत. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.