अफगाणिस्तानने केला अप्रतिम खेळ

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि हा सामना अखेर बरोबरीत सुटला. या निकालावरून एक गोष्ट पक्की होते की अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये खूप प्रगती केली आहे. या स्पर्धेत अफगाण संघ खूप दुर्दैवी राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:06 AM2018-09-27T04:06:29+5:302018-09-27T04:06:44+5:30

whatsapp join usJoin us
Afghanistan has done wonderful game | अफगाणिस्तानने केला अप्रतिम खेळ

अफगाणिस्तानने केला अप्रतिम खेळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार')

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये अत्यंत रोमांचक सामना झाला आणि हा सामना अखेर बरोबरीत सुटला. या निकालावरून एक गोष्ट पक्की होते की अफगाणिस्तानने क्रिकेटमध्ये खूप प्रगती केली आहे. या स्पर्धेत अफगाण संघ खूप दुर्दैवी राहिला. माझ्या मते या स्पर्धेचा अंतिम सामना अफगाणिस्तान विरुद्ध भारत असाच व्हायला पाहिजे होता. पण सुपर फोर गटामध्ये अफगाण संघ पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध अखेरच्या षटकात हरला. त्यांच्यामध्ये अनुभवाची कमतरता दिसून आली. नाहीतर हे दोन्ही सामने ते जिंकू शकत होते. मंगळवारी झालेल्या सामन्याविषयी म्हणायचे झाल्यास, भारताने अफगाणविरुद्ध आपला मजबूत संघ उतरवला नव्हता. शिखर धवन, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल हे प्रमुख पाच खेळाडू संघाबाहेर होते. पण तरी ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांच्यात मोठी क्षमता आहे हेही नाकारता येणार नाही. मनिष पांड्ये, लोकेश राहुल यांच्याकडे अनुभवही होता. एक खलील अहमद सोडला तर ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्या सर्वांकडे अनुभव होता. तरीही अफगाणने ज्या प्रकारे भारताला टक्कर दिली, ती नक्कीच कौतुकास्पद आहे. माझ्या मते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघाने सर्वांत लवकर प्रगती केली आहे. गेल्या दोन वर्षांतील अफगाणिस्तान संघाची कामगिरी, विशेष करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिल्यास कळून येईल की त्यांनी किती जबरदस्त प्रगती केली आहे.
भारताविरुद्ध अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहझादने लक्ष वेधले. त्याच्याकडे पाहून तो इतका चांगला खेळू शकतो यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. तो खूप मोकळेपणे खेळला. सामन्यानंतर त्याने म्हटले की, ‘या सामन्यानंतर घरी जायचे निश्चित असल्याने बिनधास्त खेळलो.’ त्यामुळे भारताविरुद्ध तो अत्यंत मोकळेपणाने आणि कोणत्याही दडपणाशिवाय खेळला. स्पर्धेवर नजर टाकल्यास एक गोष्ट कळेल की, अफगाण संघाची फलंदाजी थोडी कमजोर आहे. पण गोलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे जर का या संघाने २७०-२८० धावा उभारल्या, तर या धावांचे यशस्वी संरक्षण करणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. शिवाय अफगाण खेळाडूंमध्ये कौशल्याची कोणतीही कमी नाही. अफगाणिस्तान संघाचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेवटपर्यंत हार मानत नाहीत. त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघ अफगाणविरुद्ध सहजासहजी विजय मिळवताना दिसला नाही.
धोनीसाठी हा सामना विशेष ठरला. त्याला कर्णधार म्हणून २००वा सामना खेळण्याची संधी मिळाली. नक्कीच हा सामना जिंकण्याची त्याची इच्छा होती, पण असे झाले नाही. कर्णधार व यष्टीरक्षक म्हणून त्याने छाप पाडली असली, तरी फलंदाजीत मात्र तो पुन्हा अपयशी ठरला. रिप्लेमध्ये तो नाबाद असल्याचे दिसले. त्यामुळे तो दुर्दैवीही ठरला. तो चाचपडताना दिसला. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. रवींद्र जडेजाने शानदार पुनरागमन केले. त्याने अफगाणविरुद्ध अखेरपर्यंत भारताच्या आशा कायम ठेवल्या. पण शेवटी जर - तरच्या गोष्टी आहेत. जडेजाने विजय मिळवून देण्यास आपले पूर्ण प्रयत्न केले. शेवटी अफगाणिस्तानला त्यांच्या कामगिरीचे श्रेय द्यावेच लागेल. त्यांनी अप्रतिम खेळ केला. भारत आधीच अंतिम फेरीत पोहोचल्याने त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा नव्हता, पण अफगाणसाठी हा सामना महत्त्वाचा होता.

Web Title: Afghanistan has done wonderful game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.