7 years of WC victory: गौतम गंभीर - भारताच्या विश्वविजयाचा विस्मृतीत गेलेला हिरो

विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' आले. पण, विश्वविजयी संघातील एक योद्धा घायाळ होऊन कडेला पडलाय.

By अमेय गोगटे | Published: April 2, 2018 11:57 AM2018-04-02T11:57:28+5:302018-04-02T11:57:28+5:30

whatsapp join usJoin us
7 years of WC victory: Gautam Gambhir Forgotten Hero of world cup 2011 | 7 years of WC victory: गौतम गंभीर - भारताच्या विश्वविजयाचा विस्मृतीत गेलेला हिरो

7 years of WC victory: गौतम गंभीर - भारताच्या विश्वविजयाचा विस्मृतीत गेलेला हिरो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईः २०११ साली आजच्याच दिवशी - २ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने इतिहास रचला होता. तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशाचं विश्वविजयाचं स्वप्न साकार झालं होतं. देशभरात दिवाळी साजरी झाली होती. आज या पराक्रमाला सात वर्षं होताहेत, पण ती रात्र प्रत्येक क्रिकेटप्रेमीला जशीच्या तशी आठवते. फक्त, एका क्रिकेटवीराचा - या विश्वविजयाच्या शिल्पकाराचा बीसीसीआयसह अनेकांना विसर पडलाय. तो म्हणजे गौतम गंभीर. वर्ल्ड कप फायनलचा खरा हिरो तोच होता-आहे.

पहिल्या ओव्हरपासून ४२व्या ओव्हरपर्यंत तो टिच्चून उभा राहिला... वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या विकेट पाहूनही तो डगमगला नाही... मलिंगाचा यॉर्कर आणि मुरलीचा 'दुसरा'ही त्याचं चित्त विचलित करू शकले नाहीत... एकेरी-दुहेरी धावा घेत त्यानं धावफलक हलता ठेवला... धोनीला स्ट्राइक देण्यावर भर दिला आणि इथेच विजयाचा पाया रचला गेला... त्यावर कळस चढवण्याचं काम धोनीनं केलं होतं...

२०११च्या वर्ल्ड कपबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा महेंद्रसिंह धोनीचा विजयी षटकार, युवराजसिंग-सचिन तेंडुलकरचं आलिंगन, सचिनला खांद्यावर उचलून सहकाऱ्यांनी काढलेली मिरवणूक, युवराजला मिळालेला 'मॅन ऑफ द सीरीज' या गोष्टींची चर्चा होते. हे ऐकल्यावर, या विजयाचा खरा शिल्पकार कुठेतरी विस्मृतीत गेला आहे असं राहून राहून वाटतं. गौतम गंभीरच्या अनेक 'दर्जा' खेळींपैकी त्या ९७ धावा सर्वोत्तम होत्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं होतं, पण भारताला विजयासमीप नेण्याचं 'मिशन' फत्ते करूनच हा वीर परतला होता. 

विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' आले. आधी धोनीच्या आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली यंग ब्रिगेड इतिहास घडवतेय. पण, विश्वविजयी संघातील एक योद्धा घायाळ होऊन कडेला पडलाय. २७ जानेवारी २०१३ रोजी गौती शेवटचा वनडे सामना खेळलाय. म्हणजेच गेली पाच वर्षं तो संघाबाहेर आहे. त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. क्रिकेटबाबत अत्यंत 'गंभीर' असलेल्या या वीराला नेमकी कसली शिक्षा दिली जातेय, हेच कळत नाहीए. तो आता ३६ वर्षांचा आहे, पण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली होतेय. तरीही त्याच्यासाठी ना वनडे संघाची दारं उघडली गेली, ना कसोटी संघाची. त्यामुळे गौतम गंभीर हा बिनीचा शिलेदार क्रिकेटमधील राजकारणाचा बळी ठरलाय, असंच खेदाने म्हणावं लागेल. 

९९ टक्के मेहनत + एक टक्का नशीब हे गणित जुळून आलं की यश हमखास मिळतं. हे एक टक्का नशीब बहुधा गौतम गंभीरसोबत नसावं. वर्ल्ड कप फायनलमध्ये हुकलेलं शतक, 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने दिलेली हुलकावणी, हे 'बॅड लक'च तर आहे. ते शतक जर झालं असतं, तर तो कदाचित असा झाकोळला गेला नसता. कारण, या 'अँग्री यंग मॅन'ची मेहनत आणि तंत्रशुद्ध क्रिकेट आपण सगळ्यांनीच पाहिलंय. ते पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल की नाही माहीत नाही, पण आयपीएलमध्ये तरी गंभीरची बॅट तळपावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. 

Web Title: 7 years of WC victory: Gautam Gambhir Forgotten Hero of world cup 2011

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.