Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीत आमदारांची परीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 03:35 PM2019-03-31T15:35:31+5:302019-03-31T15:35:38+5:30

जिल्ह्यातील आगामी काळातील राजकीय दिशा ठरवणारी ही निवडणूक असल्याने २०१९ च्या या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे.

Lok Sabha Election 2019: Examination of MLAs in Lok Sabha elections! | Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीत आमदारांची परीक्षा!

Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीत आमदारांची परीक्षा!

Next

- नीलेश जोशी 
 
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा पूर्वार्ध २९ मार्च रोजी संपुष्टात आला असून, उत्तरार्धातील प्रचार सभांचा धुराडा आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दृष्टीने मतदारांच्या मनावर गारुड करण्याची तयारी बुलडाणा लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांनी चालवली आहे. असे असले तरी १७ व्या लोकसभेची निवडणूक ही लोकसभा मतदार संघातील युतीच्या चार आणि काँग्रेसच्या दोन आमदारांसाठी चांगलीच परीक्षा पाहणारी ठरणार आहे. त्यातच जिल्ह्यातील आगामी काळातील राजकीय दिशा ठरवणारी ही निवडणूक असल्याने २०१९ च्या या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे.
युतीच्या आमदारांच्या कार्याचे प्रसंगी शीर्षस्थ नेतृत्त्व लोकसभेच्या निकालानंतर मूल्यमापन करणार असतानाच आघाडीच्या दृष्टीने जमेची बाजू असलेले काँग्रेसचे दोन्ही आमदारही विधानसभेच्या दृष्टीने आपले अस्तित्व पुढील काळात अधिक मजबूत करण्यासाठी लोकसभेच्या मैदानात बारकाईने लक्ष घालून आहेत. युतीच्या धर्मात छुपी आघाडी, अशा वावड्या सध्या उठत असल्या तरी युतीतील शीर्षस्थ नेत्यांचेही जिल्ह्यातील राजकीय घडामोडींकडे बारकाईने लक्ष आहे. असे असले तरी प्रत्यक्षात अवघ्या पाच महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उभय पक्षाच्या आमदारांना विधानसभेच्या दृष्टीने एक प्रकारे रंगीत तालिम करण्याची संधीही या माध्यमातून मिळालेली आहे. त्यामुळे आपला परफॉर्मन्स मेरिटमध्येच राहील, याची काळजीही लोकसभा निवडणुकीत उभय बाजूंच्या आमदारांना घ्यावी लागणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोकसभा मतदार संघाचा विचार करता भाजपचे दोन, शिवसेनेचे दोन असे युतीचे एकूण चार तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत. बुलडाण्यात युतीविरुद्ध आघाडी अशी थेट लढत होत आहे.
२०१९ ची बुलडाण्यातील आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यातील लढत ही जिल्ह्याचे पुढील १५ ते २० वर्षाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी राहणार आहे. किंबहुना या दोघांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. २०१९ ची ही निवडणूक दोघांचा जिल्ह्यातील राजकारणावर कितपत प्रभाव आहे आणि भविष्यात तो अधिक व्यापक कसा करतात याचे गणित सोडविणारी ही लढत असल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या तुल्यबळ लढतीत प्रत्यक्ष कोण बाजी मारतो, हे लोकसभा निवडणुकीच्या उत्तरार्धात स्पष्ट होणार असले तरी विद्यमान आमदारांसाठी ही निवडणूक एक परीक्षा म्हणून समोर येत आहे.


मताधिक्याचा मुद्दा चर्चेत
लोकसभा निवडणुकीत कोणाचा जय-परायज होतो, यापेक्षा आपल्या विधानसभा क्षेत्रात कोणाला मताधिक्य मिळते, याचीच चर्चा अधिक आहे. प्रामुख्याने खामगाव, मेहकर, सिंदखेड राजा, जळगाव जामोद या चार मतदार संघात कोणाला मताधिक्य मिळते, यावर चर्चा होत आहे. सेनेच्या दृष्टीने बुलडाणा विधानसभा ही तितकीच महत्त्वाची आहे. येथील सेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना अमरावतीचे सहसंपर्क प्रमुख पद दिल्याने ते कधी अमरावती तर कधी बुलडाणा असे राहणार आहेत. एकंदरीत लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांनी त्यांच्या विरोधकांनाही योग्य पद्धतीने हाताळण्यास प्रारंभ केला आहे.


प्रतिष्ठा पणाला
४तब्बल दहा वर्षानंतर आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रताप जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत आहे. दोघांमधील ही लढत जिल्ह्याचे आगामी १५ ते २० वर्षाच्या राजकारणीची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे या तुल्यबळ लढतीमध्ये कोण बाजी मारतो हे उत्सुकतेचे असले तरी दोघांच्याही प्रतिष्ठा येथे पणाला लागल्या आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019: Examination of MLAs in Lok Sabha elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.