Ganesh Mahotsav; यवतमाळात पोलिसांकडून सामूहिक गणेश विसर्जनाचा वेगळा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 11:16 IST2020-08-22T11:15:34+5:302020-08-22T11:16:21+5:30
नगरपरिषदांच्या सहाय्याने गणेश विसर्जनासाठी रथ तयार केला जाणार आहे. पोलिसांचा हा रथ मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहे. एका रथात एका वेळी किमान १० ते २० सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नेले जाणार आहेत.

Ganesh Mahotsav; यवतमाळात पोलिसांकडून सामूहिक गणेश विसर्जनाचा वेगळा प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: दरवर्षी जिल्ह्यात तब्बल एक हजार ७२३ सार्वजनिक मंडळांकडून गणेशाची स्थापना करून उत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनामुळे पोलिसांनी केलेल्या आवाहनाला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रस्त्यावर मंडप न टाकता उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात जाहीर केला. विशेष असे, मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने आपल्या खांद्यावर घेतली.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यावर्षी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वांनीच जोरदार प्रतिसाद दिला. त्यानुसार आतापर्यंत ८१२ मंडळांनी आपण यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नाही असे लेखी कळविले आहे. सुमारे साडेसहाशे सार्वजनिक मंडळ गणेशाची स्थापना करणार, परंतु त्यासाठी कुठेही रस्त्यावर मंडप टाकणार नाही. दुकान, मंदिर अथवा पदाधिकाऱ्याच्या घरी ही स्थापना केली जाणार आहे. तर सध्या १०० ते १२० मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर ठाम आहे. त्यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जातोय.
यावर्षी गणेश मंडळांना कोरोनामुळे फारशी वर्गणी मिळण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे गणेश विसर्जनासाठी ट्रॅक्टर लावण्याचा त्यांचा खर्च वाचविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. शिवाय किमान चार-पाच लोक व ट्रॅक्टर एकाच वेळी रस्त्यावर आल्यास गर्दी होण्याची भीती आहे. म्हणून नगरपरिषदांच्या सहाय्याने गणेश विसर्जनासाठी रथ तयार केला जाणार आहे. मंडळांनी आपल्या गणपतीची आरती व पूजाअर्चा करायची, पोलिसांचा हा रथ मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहे. विसर्जनासाठी वेगवेगळे दिवस ठरवून दिले जाणार आहे. एका रथात एका वेळी किमान १० ते २० सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नेले जाणार आहेत. त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येईल. त्यामुळे कोरोना काळात संसर्ग रोखणे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार आहे. सामाजिक स्वाथ्यही त्यातून सांभाळले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांच्या नियोजनांचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी गणेशोत्सव तयारीचा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून आढावा घेतला. पोलिसांनी उत्सव काळातील गर्दी टाळण्यासाठी सादर केलेल्या नियोजनाचे पालकमंत्र्यांनी तोंड भरुन कौतुक केले. अजूनही सार्वजनिक उत्सवाच्या मानसिकतेत असलेल्या १०० ते १२० मंडळांना कन्व्हेन्स करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी एसपींना केल्या.
समाजकार्यावरच द्या जोर
गणेश मंडळांनी खर्चाचे नियोजन केले. परंतु हा पैसा मंडप टाकून उत्सव करण्याऐवजी कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या गोरगरिबांना मदतीसाठी वापरण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. त्याला मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थन दिले आहे.
गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप कोरोनामुळे यंदा थांबविण्याचा प्रयत्न आहे. त्याला मंडळांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून त्यांची पोलिसांना साथ आहे.
- एम. राज कुमार पोलीस अधीक्षक