Video : यवतमाळातील चिंचमंडळ ग्रामसभेत राडा; ग्रामसेवकाला मारहाण, पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 18:04 IST2022-04-30T15:21:42+5:302022-04-30T18:04:38+5:30
ग्रामसेवक किशोर खरात यांनी महिला सदस्याच्या पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिली. तर महिला सदस्याने ग्रामसेवकाविरोधात वाईट हेतूने हात पकडत विनयभंग केल्याची तक्रार दिली.

Video : यवतमाळातील चिंचमंडळ ग्रामसभेत राडा; ग्रामसेवकाला मारहाण, पोलिसात तक्रार
मारेगाव (यवतमळ) : तालुक्यातील चिंचमंडळ येथील ग्रामसभेत जोरदार राडा झाला. गावातील पाणीप्रश्न व जुन्या जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रांवरून ग्रामसेवक व ग्रामपंचायत महिला सदस्य पतीमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
चिंचमंडळ येथे मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मासिक सभेचा वेळ निघून गेल्यानंतर सरपंच व एक महिला सदस्य हजर झाले. महिला सदस्याने पाणी प्रश्न व यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याबाबत जाब विचारला. मात्र यावर समाधान झाले नसल्याने महिला सदस्याचे पती सचिवास भेटण्यास गेले. यावेळी दोघांत शाब्दिक खडाजंगी होत महिला सदस्याच्या पतीने थेट सचिवांच्या कानशिलात लगावल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली.
महिला सदस्यानीही ग्रामसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केल्याने ग्रामसेवक खरात यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. तर शासकीय कामात अडथळा निर्माण व अनु. जाती / जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत सातपुते यांच्यावर मारेगाव पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने चिंचमंडळ ग्राम पुन्हा चर्चेत आले आहे.
यवतमाळातील चिंचमंडळ ग्रामसभेत राडा; ग्रामसेवकाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरलhttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/9y8a8jRX5R
— Lokmat (@lokmat) April 30, 2022
शुक्रवारला चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते. या सभेकरता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते. मात्र विहीत वेळेतील ग्रामसभा सदस्यांच्या अनुपस्थितीने झाली नाही.
दरम्यान या मासिक सभेकरिता ग्रामपंचायत सदस्य उशीरा भाग्यश्री दिवाकर सातपुते या पतीसह उपस्थित झाल्या. यावेळेस जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रे आणि अलीकडेच गावातील पेटत असलेला पाणी प्रश्नांवरून त्यांच्यात व सदस्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळेस ग्रामसेवक किशोर खरात यांनी सदस्य सातपुते यांच्या पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करीत मारहाण केल्याची तक्रार पोलिसात तक्रार दिली. तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने हात पकडत विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.
तक्रारीनुसार ग्रामसेवक किशोर खरात यांचेवर विनयभंगाचा तर दिवाकर सातपुते यांचेवर शासकिय कामात अडथळा आणि अनु .जाती / जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत मारेगाव पोलिसात शुक्रवारला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहेत.