वसईच्या आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना दिला 'लसीकरणाचा' प्रसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 17:52 IST2021-09-16T17:37:50+5:302021-09-16T17:52:54+5:30
Vasai Ganeshotsav : वसईकरांसाठी मंडळाने यंदा लसीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे अनेक भाविकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला.

वसईच्या आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भाविकांना दिला 'लसीकरणाचा' प्रसाद!
वसई रोड पश्चिमेकडील 'आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बाप्पाचा प्रसाद म्हणून भाविकांना चक्क लसीकरणाचा लाभ मिळवून दिला. कोरोनावर मात करण्यासाठी वेगाने लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता वसईकरांसाठी मंडळाने यंदा लसीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे अनेक भाविकांना या उपक्रमाचा लाभ घेता आला. गेल्या वर्षी लॉक डाऊन काळात मंडळातर्फे गरजू लोकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले होते.
"नवसाला पावणारा वसईचा महाराजा" अशी आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सवातील बाप्पाची ख्याती आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात मानाचा गणपती अशीदेखील त्याची ओळख आहे. या मंडळाची स्थापना १० सप्टेंबर १९८३ रोजी झाली. यंदा हे मंडळाचे ३९ वे वर्ष आहे. गिरगावमधून स्थलांतरित झालेल्या काही तरुणांनी या गणेश मंडळाची स्थापना केली. बाप्पाची संपूर्ण वस्त्रधारी मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. मराठमोळा फेटा, सदरा, पितांबर यामुळे बाप्पाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसत आहे. ४ फूट उंचीची ही गणेश मूर्ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मूर्तिकार कै.विजय खातू ह्यांच्या कन्या मूर्तिकार रेश्मा खातू ह्यांनी परळ येथील आपल्या कार्यशाळेत बनवली आहे. मंडळाचा गणेशोत्सव सात दिवसांचा असतो.