नालासोपाऱ्यात द्वारका हॉटेलला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2024 18:30 IST2024-04-30T18:29:33+5:302024-04-30T18:30:44+5:30
आचोळे रोडवरील मंगळवारी दुपारची घटना

नालासोपाऱ्यात द्वारका हॉटेलला भीषण आग
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहराच्या पूर्वेकडील आचोळे रोडवर असलेल्या द्वारका हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तिघांना मनपा रुग्णालयात आणि चौघांना एव्हरशाईन येथील आयसिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.
यातील दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर जखमी असल्याची माहिती आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी लोकमतला दिली. भीषण आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. आता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. द्वारका हॉटेलमध्ये सिलेंडरचे ब्लास्ट झाल्याचे सूत्रांकडून कळते. नेमकी ही आग कशामुळे लागली याचा पोलीस तपास करत आहे. या हॉटेलच्या बाजूला नवीन गटार बांधण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू असताना गुजरात गॅस पाईप लाईन फाटल्यामुळे ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. घटनास्थळी मनपाचे अधिकारी वर्गही पोहोचला होता.