Maharashtra Election 2019: Party's reluctance to give leadership to women; 33% struggle for reservation | Maharashtra Election 2019: महिलांकडे नेतृत्व देण्यास पक्षांची अनास्था; ३३ टक्के आरक्षणासाठी संघर्ष
Maharashtra Election 2019: महिलांकडे नेतृत्व देण्यास पक्षांची अनास्था; ३३ टक्के आरक्षणासाठी संघर्ष

पालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील सहापैकी डहाणू, विक्रमगड, वसई आणि नालासोपारा या चार विधानसभा मतदार संघातील महिला उमेदवारांवर भरलेले अर्ज मागे घेण्याची वेळ ओढवली. यामुळे विधानसभेवर महिला उमेदवारांना पाठविण्यात राजकीय पक्षांतील पुरु षांचे वर्चस्व आड येत असल्याने महिला वर्गातल्या नाराजीची दबकी चर्चा जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारसरणी आणि महिला विकासाचा पुरस्कार करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण लागू झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेसाठी तेहतीस टक्के आरक्षण मिळवण्यासाठी महिलांना झगडावे लागत आहे. २०१९ ची लोकसभा आणि २१ आॅक्टोबर रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही महिलांना उमेदवारी देण्यात राजकीय पक्षांना विशेष रस नसल्याचे दिसून आले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्र मगड, पालघर, बोईसर, वसई आणि नालासोपारा या मतदारसंघापैकी सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी डहाणू विधानसभा मतदार संघातील सेनेच्या माजी जि.प. सदस्य वैदही वाढाण, विक्रमगडहून सुरेखा थेतले आणि वसई तसेच नालासोपारा मतदारसंघातून माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी अर्ज मागे घेतला.
विक्र मगड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा सुरेखा थेतले यांना होती. मात्र यासाठी माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांना भाजपमधून झुकते माप दिल्याच्या नाराजीतून थेतले यांनी अपक्ष लढण्याच्या इराद्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी अर्ज मागे घेण्याच्या आधी सर्व बंड थंड केले जातील असा इशारा दिल्याने अर्ज माघार घेण्याच्या आदल्या दिवशी सुरेखा थेतले यांसह अन्य दोन बंडखोर उमेदवारांना मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावून घेत अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे तीनही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
थेतले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून स्वत:चे नेतृत्वगुण सिद्ध करताना जिल्हापरिषदेच्या अडीच वर्षाच्या कालावधीत महिला सक्षमीकरणासह अनेक सकारात्मक निर्णय घेत आपली छाप पाडली होती. सेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या वैदेही वाढाण या सध्या जिल्हा उपमहिला संघटक असून पालघर, डहाणू विधानसभा मतदार संघातील गाव-पाड्यात निष्ठेने काम करून महिलांची फळी उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पालघर अथवा डहाणू मतदारसंघात त्या उमेदवारीसाठी त्या इच्छुक होत्या. डहाणू विधानसभेत त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश पक्ष श्रेष्टींनी दिल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यांनाही अर्ज मागे घेण्यात सांगण्यात आल्याने त्या नाउमेद झाल्या आहेत. तर वसई व नालासोपारा या शहरी मतदार संघातून माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे.

नेतृत्व गुण असूनही संधी नाही
या तीनही महिला उमेदवारांची आतापर्यंतची यशस्वी राजकीय कारकीर्द आणि जनमानसातील प्रभाव पाहता या जिल्ह्यातून विधानसभेवर जाणारे खमके नेतृत्वगुण त्यांच्यात होते.
मात्र राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांना लोकसभा आणि विधानसभेवर पाठविण्यात पक्षात वर्चस्व असलेल्या पुरूषांना स्वारस्य नसल्याचे दिसते.
त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत, जिल्ह्यातील
महिलांचा विचार होईल का? याची
वाट पहावी लागणार आहे.

अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत असताना दोन वर्षांपासून डहाणू - पालघर मतदार संघात पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम करते. महिला मतदारातून मला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी होत असल्याने अर्ज भरला. तो वरिष्ठांच्या आदेशाने मागे घेतला.
- वैदेही वाढाण,
शिवसेना, जिल्हा उपसंघटक.

Web Title: Maharashtra Election 2019: Party's reluctance to give leadership to women; 33% struggle for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.