महाविकास आघाडी कमकुवत झाल्याने भाजप-शिंदेसेनेतच सत्तेसाठी रस्सीखेच
By धीरज परब | Updated: December 25, 2025 09:05 IST2025-12-25T09:04:41+5:302025-12-25T09:05:01+5:30
स्थानिक पातळीवर जागांच्या वाटपाची तेढ; परप्रांतीय मतदारांची संख्या अधिक

महाविकास आघाडी कमकुवत झाल्याने भाजप-शिंदेसेनेतच सत्तेसाठी रस्सीखेच
- धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरा रोड : मिरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत २४ प्रभाग आणि ९५ नगरसेवक असणार आहेत. विरोधी पक्ष महाविकास आघाडी कमकुवत झाल्याने भाजप व शिंदेसेनेत सत्ता मिळवण्यासाठी खरी लढत आहे. भाजप व शिंदेसेनेत स्थानिक पातळीवर जागांच्या वाटपावरून तेढ आहे.
२०१७च्या पालिका निवडणुकीत भाजपला ४ सदस्य पॅनल पद्धत, मोदी लाटेसह राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील नागरिकांची मोठी संख्या यामुळे ६१ जागा जिंकता आल्या. एकेकाळी सत्तेत असलेली राष्ट्रवादी पूर्णपणे फुटून नगरसेवक पदाधिकारी अन्यत्र गेले. काँग्रेसला केवळ १२, तर शिवसेनेला २२ जागा मिळाल्या होत्या.
आमदार नरेंद्र मेहता यांनी ९५ पैकी केवळ १७ जागा शिंदेसेनेला देऊन स्वतः ६५ जागा मागितल्या आहेत. तर उरलेल्या १३ जागा वाटून घेण्यास युतीसाठी सरनाईक यांना माझ्याकडे यावे लागेल, या त्यांच्या वक्तव्याने मंत्री प्रताप सरनाईक नाराज आहेत. मंत्री सरनाईक यांनी युतीसाठी ५० टक्के जागा प्रत्येकी देण्याची मागणी केले आहे.
अन् जनतेने नरेंद्र मेहतांना दाखवला घरचा रस्ता
एकहाती सत्ता आणि आमदारकी यामुळे पालिकेच्या प्रशासन व कामकाजासह शहरावर नियंत्रण मिळवण्याच्या नादात मेहता वादग्रस्त ठरले. पालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली. त्यातूनच २०१९ला जनतेने मेहतांना घरचा रस्ता दाखवला.
२०२४ मध्ये महायुती सरकार येऊन प्रताप सरनाईक मंत्री झाले. या कालावधीत मंत्री सरनाईक यांनी अनेक विकासकामे व सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम केले.
काँग्रेस, मनसे, उद्धवसेनेत प्रभावी नेतृत्वाचा अभाव
शहरात काँग्रेसची ताकद मर्यादित असून, मुझफ्फर हुसेन यांचे अनुभवी नेतृत्व असले तरी सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा आहे.
उद्धवसेनेसह मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे येथे प्रभावी नेतृत्व नाही. तसेच महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून शक्य आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीरपणे अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे मंत्री सरनाईक देखील या निवडणुकीदरम्यान तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.