सायकल चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ६ गुन्ह्यांची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2023 18:00 IST2023-06-26T18:00:27+5:302023-06-26T18:00:41+5:30
विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी सायकली चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला दिवा येथून अटक केली आहे.

सायकल चोरी करण्याऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, ६ गुन्ह्यांची उकल
नालासोपारा (मंगेश कराळे) : विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी सायकली चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला दिवा येथून अटक केली आहे. आरोपीकडून सहा गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी सोमवारी दिली आहे.
विरारच्या पुष्पा नगरमधील फ्रंट व्हीव सोसायटीत राहणाऱ्या ब्रोंडा शंतनु रॉय यांनी त्यांची हिरो प्रींट कंपनीची सायकल राहत असलेल्या ठिकाणी मोकळया जागेत पार्क केली होती. १२ जूनला चोरट्याने चोरी करून नेली म्हणून विरार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. मागील काही महिन्यांमध्ये विरार पोलीस ठाणे हद्दीत दिवसा व रात्री सायकल चोरी गुन्हयांचे प्रमाण वाढले होते. नमुद गुन्हयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हयांचा तपास विरार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुरु केला.
गुन्ह्यातील आरोपीताचा शोध घेणेकरीता घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदाराकडील प्राप्त माहितीच्या आधारे आरोपी हा दिवा येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिवा गाव याठिकाणी सलग दोन दिवस सापळा रचुन आरोपी अंश ऊर्फ संदीप माताप्रसाद जैस्वाल याला ताब्यात घेवुन तपास केला. त्याने नमुद गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्याला अटक केले. अटक आरोपीकडे अधिक तपास करुन ६ गुन्हयांची उकल करून गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, मोहसिन दिवान, सचिनबळीद, बालाजी गायकवाड, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केली आहे.