३७ लाख ५१ हजारांचा २ किलो चरस व १ किलो गांजा जप्त; दोन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 19:32 IST2025-10-19T19:31:51+5:302025-10-19T19:32:10+5:30
वालीव पोलिसांची कामगिरी!

३७ लाख ५१ हजारांचा २ किलो चरस व १ किलो गांजा जप्त; दोन आरोपींना अटक
नालासोपारा (मंगेश कराळे) :- वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींकडून ३७ लाख ५१ हजार रुपये किंमतीचा २ किलो ७४ ग्रॅम चरस, १ किलो ५० ग्रॅम गांजा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी दिली आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ ऑक्टोबरला इरफान खत्री हा वसई पूर्वेकडील खैरपाडा येथे त्याच्या राहत्या घरातुन चरस अंमली पदार्थ विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त यांनी आदेश दिला. सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज व वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरक्षनाथ जैद तसेच गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व अंमलदार यांचेसह कारवाईसाठी टिम तयार केली. त्या टीमने वालीव गाव, खैरपाडा, चिंतामणी कम्पाऊंडमधील मोमीन चाळीतील रुम नं १२ समोर रुममध्ये आरोपी इरफान सुलेमान खत्री (७०) याच्या अंगझडतीमध्ये १ किलो ८८ ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ, मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १६ लाख ३७ हजार ८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास केल्यावर तबरेज अमीन मियान खान (२५) हा आरोपी निष्पण झाल्याने त्याला वालीव परिसरातुन ताब्यात घेतले. त्याचेकडुन १ हजार ३८६ ग्रॅम वजनाचा चरस अंमली पदार्थ व १ हजार ५० ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ, रोख रक्कम, मोबाईल असा मुदेमाल जप्त केला. दोन्ही आरोपीताकडुन ३७ लाख ५१ हजार ८० रुपये किंमतीचा २ किलो ७४ ग्रॅम चरस, १ किलो ५० ग्रॅम गांजा व इतर मुद्देमाल जप्त केला. सदर बाबत वालीव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट) कलम ८ (क), २०(ब), ए (क), २९, ८ (क), २०(ब), (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने- पाटील, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरक्षनाथ जैद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि विश्वासराव बाबर, सहा. फौजदार शैलेश पाटील, पो. हवा किरण म्हात्रे, आनंद मोरे, बाळु कुटे, विनायक राऊत, अनिकेत पाटील, सचिन लांडगे, केतन गोडसे, मसुब नागनाथ केंद्रे यांनी केली आहे.