पाणीपुरवठा होणार ठप्प? ; महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आलेय आर्थिक अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:31 IST2025-01-30T16:30:43+5:302025-01-30T16:31:29+5:30
Wardha : नागरिकांनी थकविली जवळपास २९ कोटींची पाणीपट्टी

Water supply will be disrupted; Maharashtra Life Authority is in financial difficulty
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावांसह इतर १३ गावांतील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचे काम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून केले जात आहे. या योजनेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे आहे.
या योजनेला आता दोन दशकाचा कालावधी झाला असून, ही योजना पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. परंतु, या कालावधीत ग्राहकांनी तब्बल २९ कोटींचा पाणीकर थकविल्याने ही योजना आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे या १४ ही गावांतील पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे), कारला, सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), साटोडा, आलोडी, दत्तपूर, नालवाडी, म्हसाळा, वरुड, वायगाव (निपाणी) व या गावांना पिपरी (मेघे) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे केला जातो.
सद्यःस्थितीत या सर्व गावांमध्ये जवळपास २५ हजार नळजोडण्या असून, त्याद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जातो. परंतु, बहुतांश ग्राहकांनी अनेक वर्षापासून पाणीपट्टीच भरलेली नाही. परिणामी २९ कोटींचा कर थकला आहे. वारंवार सूचना देऊनही ग्राहकांकडून पाणीपट्टी भरली जात नसल्याने योजना चालवायची कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१४ गावे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबून
वर्धा शहरालगतच्या १४ मोठ्या गावांना जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केला जातो. पण, त्यांनी पाणीपट्टी थकविल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.
ऑनलाइन पाणीपट्टी भरण्याचीही सुविधा
पिपरी (मेघे) व सावंगी (मेघे) यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात येऊन पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तेव्हा ग्राहक नियमित भरणा करीत होते. परंतु, काही दिवसांपासून नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे प्राधिकरणकडून ग्राहकांना पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. देयकावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही किंवा आरटीजीएसच्या माध्यमातूनही रक्कम अदा करू शकतो.
जलजीवन मिशनने अडचणीत भर
जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून हर घर नल से जल देण्याचे काम सुरू आहे. परंतु, रामभरोसे कामकाज असल्याने अनेक गावांमध्ये जलवाहिनी टाकण्यात आली; परंतु एक ते दीड वर्षापासून नळजोडणीच झाली नाही. असाच काहीसा प्रकार शहरालगतच्या १४ गावांत असून, बहुतांश नळजोडण्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला नोंदच नाही. परिणामी आधीच अडचणीत असलेल्या प्राधिकरणाला आणखी अडचणीत टाकले आहे. सध्या जलजीवन मिशन अंतर्गतही साडेपाच कोटींची जिल्हा परिषदेकडे थकबाकी आहे.
कुठे किती नळजोडण्या, किती थकबाकी
गाव नळजोडणी थकबाकी
पिपरी (मेघे) ५४१६ ४,९९,१७,३८९
सिंदी (मेघे) ३२२० ३,३५,५०,२५६
बोरगाव (मेघे) २४७० ३,७९,३७,३४७
सावंगी (मेघे) १६७० २,४६,८३,४८४
साटोडा १४०७ १,६३,४९,५३८
आलोडी ५१३ २५,२३,१४०
म्हसाळा १४६९ ६७,१९,१०२
चितोडा ३२ १,३९,७४१
वरुड ६११ ३८,३६,८१२
नालवाडी २२३३ १,९३,४७,८६१
उमरी (मेघे) २३२ २,१६,८७९
वायंगाव (निपाणी) १०१२ ६,५२,४९,११५
सेलू (काटे) ०३ १,०३,४६३
"ग्राहकांकडे जवळपास २९ कोटींची थकबाकी आहे. वसुलीकरिता भरारी पथक तयार केले आहे. पथकाने दोन महिन्यांत १७ लाख वसूल केले असून, मार्चअखेरपर्यंत पाच कोटीचे उद्दिष्ट आहेत. नागरिकांकडून कराचा नियमित भरणा होणे अपेक्षित आहे, अन्यथा नळ जोडण्या तोडण्याचीही कार्यवाही करावी लागेल."
- दीपक धोटे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा