तीन हजार वर्षांचा इतिहास शिळावर्तुळाखाली दफन; संशोधनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:17 IST2025-01-13T18:16:45+5:302025-01-13T18:17:47+5:30

संशोधनाची गरज : खैरवाडा पर्यटन केंद्राची २० वर्षांपासून मागणी, पूर्तता कधी?

Three thousand years of history buried under a stone circle; Demand for research | तीन हजार वर्षांचा इतिहास शिळावर्तुळाखाली दफन; संशोधनाची मागणी

Three thousand years of history buried under a stone circle; Demand for research

लोकमत न्यूज नेटवर्क 
आर्वी :
ताम्रपाषाण युगानंतर लोखंडाचा शोध लागल्याने शेतीची प्रगती झाली. या काळाला लोह-बृहदाश्मयुग हे नाव संबोधले जाते. या संस्कृतीचे विपुल पुरावे नजीकच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील खैरवाडा गावात आढळून आले आहे. येथे आढळून येणारे शिळावर्तुळ हे हजारो वर्षापूर्वीचे असल्याने या ठिकाणी खैरवाडा पर्यटन केंद्राची मागणी सातत्याने केली. मात्र अद्यापही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.


खैरवाडा गावचे संशोधन सर्वप्रथम १८८१ मध्ये डॉ. जे कॅरन यांनी केले. १९८१ साली डेक्कन कॉलेज पुणेच्या पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी सर्वेक्षण केले होते. त्यात पंधराशे शिलावर्तुळे आढळून आली होती. ही शिळावर्तुळे लोहबृदाश्मयुगातील असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. या संस्कृतीचा काळ इ.स.पू. १००० पासून इ.स.पू. ७००-८०० पर्यंतचा असून, कर्नाटकातील कुमरणहळळी येथे इ.स.पू. १३०० मध्ये या संस्कृतीची सुरुवात झाल्याचे मानण्यात येते. 


या संस्कृतीची दफनाची एक विशिष्ट पद्धत होती. यात साधारणपणे तीन प्रकारचे दफन करण्यात येत होते. संपूर्ण शरीराचे दफन, अग्निसंस्कारानंतर हाडे संग्रहित करून त्यांचे दफन, पारशी लोकांच्या पद्धतीसारखे पशूनी खाल्ल्यावर अस्थिसांगाड्याचे दफन. दफनाकरिता साधारणपणे एक खड्डा खणून त्यात शव किंवा सांगाडा किंवा अस्थिअवशेष व त्याने वापरलेल्या वस्तू, नंतरच्या जीवनात उपयोगी पडू शकणाऱ्या वस्तू व मृताच्या प्रिय वस्तू यांचे दफन करून खड्डा मातीने बुजवून त्याच्या सभोवती वर्तुळाकार मोठमोठे दगड ठेवण्यात येत असत. खैरवाडा परिसरात आजही ही शिलावर्तुळे सुस्थितीत असून, काही शेतीमुळे सपाट करण्यात आली आहेत. 


शिलावर्तुळाचे विविध आकार उपलब्ध 
शिलावर्तुळाचे मोजमाप केले असता शिलावर्तुळाचा व्यास ३० फूट, ४० फूट, व ५० फूट आढळून आला. ही १० फुटांच्या प्रमाणात असलेली शिलावर्तुळे वैशिष्ट्यपूर्णच आहे. उंची ३ ते ५ फूट उंच आहे. शिलावर्तुळाचा व्यास याच्या संबंधाच्या संशोधनाची गरज आहे. प्रत्येक शिलावर्तुळात ४० पाषाण खंड आहेत. वनखात्याच्या जमिनीवरील शिलावर्तुळे आजही सुस्थितीत आहेत. काही पाषाण खंड ५-६ फूट उंचीचे असून, काही पंचकोन व षटकोणी स्तंभाच्या आकाराचे आहेत.


पर्यटन केंद्रासाठी आमदारांकडे साकडे 
तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेले खैरवाडा (ता. कारंजा) गावाला पर्यटन केंद्र म्हणून घोषित करावे. या ठिकाणी पुरातत्त्व संग्रहालय स्थापन करण्यात यावी अशी मागणी विदर्भ पर्यटन व पर्यावरण संस्था रोहणाच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून शासनाकडे केल्या जात आहे. मात्र, अद्याप याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे याचा पाठपुरावा करून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ही मागणी मान्य करून घ्यावी यासाठी आमदार सुमित वानखडे यांना साकडे घालण्यात आले.

Web Title: Three thousand years of history buried under a stone circle; Demand for research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा