Teachers, preaching? Careful! | शिक्षकांनो, प्रचार करताय? सावधान!

शिक्षकांनो, प्रचार करताय? सावधान!

ठळक मुद्देनोकरीवर येईल गंडांतर : निवडणूक आयोगाचे जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत येत आहे. प्रचार सभा, प्रचार रॅलींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. प्रचार यंत्रणा राबवताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी तसेच खासगी शाळेतील शिक्षकांचा सहभाग मागील निवडणुकीत दिसून आला आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने कडक निर्बंध घालताना प्रचार रॅली अथवा सभांमध्ये शिक्षक आढळून आल्यास त्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.
निवडणूक विभागाने तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे प्रचारात शिक्षकांचा वापर करणाºया राजकीय पक्षाला दक्षता घ्यावी लागणार आहे. आता होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करणाºया शिक्षकांवर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचीही नजर राहणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्था या कोणत्या-कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तसेच सरकारी शाळेतील शिक्षकांनाही सत्ताधाऱ्यांच्या आदेशामुळे निवडणुकीत काम करावे लागत आहे. त्यातील काही शिक्षक हे मन लावून काम करतात तर काही शिक्षकांना राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा नाईलाजाने प्रचार करावा लागत होता.
जिल्ह्यात शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा सुयोग्य वापर करण्याचे तंत्र येथील राजकीय पक्षांना चांगलेच अवगत झालेले आहे. बदली करण्याची, नोकरीवरून काढण्याची, अशा विविध दबावतंत्राचा वापर करून शिक्षकांना प्रचार करण्यास भाग पाडले जाते. मोठ्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध असल्याने त्यांचा प्रचार कार्यात राबविले जाते. प्रचार रॅली, प्रचार सभा, प्रचाराचे व्यवस्थापन यासह अन्य कामासाठी त्यांना जुुंपले जाते.
राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवताना शिक्षकांना पाहिले आहे. अगदी प्रचार सभेसाठी खुर्च्या लावण्यापासून त्या उचलण्यापर्यंतची कामे कामेही शिक्षक करीत आलेले आहेत. काही ठिकाणी तर मतदारांबरोबर संपर्क साधण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडलेली आहे. ही बाब आता निवडणूक विभागाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे प्रचारात शिक्षक दिसल्यास त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.
त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांचा प्रचार करताना जे शिक्षक आढळतील, त्या उमेदवारावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने तसे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांसह राजकीय पक्षांचेही धाबे दणाणले आहेत.

शिक्षकांवर असेल ‘वॉच’
निवडणूक विभागाच्या अशा कडक भूमिकेमुळे राजकीय पक्षांना आता मनुष्यबळाची कमतरता भासणार आहे. शिक्षकांचा प्रचारात वापर करणाऱ्या राजकीय पक्षांना आता आयत्या वेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रचाराची धुरा सांभाळावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही अशा शिक्षकांवर नजर राहणार असल्याने वादावादीचे प्रकार पुढे पाहायला मिळणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रचार सभा, बैठका, प्रचार रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येते. यासाठी कायमस्वरूपी पथक तैनात केलेले असते. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातात. चित्रीकरणात शिक्षक दिसल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे.

Web Title: Teachers, preaching? Careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.