तडीपार गावगुंड ‘बाटला’नेच ते ड्रग्ज वर्ध्यात आणले होते! अटकेतील आरोपीचा खुलासा
By चैतन्य जोशी | Updated: January 7, 2024 16:31 IST2024-01-07T16:31:00+5:302024-01-07T16:31:22+5:30
‘थर्टी फर्स्ट’ रोजी सायंकाळच्या सुमारास शहर पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्याला अटक केली होती.

तडीपार गावगुंड ‘बाटला’नेच ते ड्रग्ज वर्ध्यात आणले होते! अटकेतील आरोपीचा खुलासा
वर्धा : ‘थर्टी फर्स्ट’ रोजी सायंकाळच्या सुमारास शहर पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्याला अटक केली होती. त्याने पोलिस कोठडीत असताना वर्धा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गावगुंड बाटला उर्फ राहुल शिवपालं बहादुरे रा स्टेशन फैल हाच एमडी ड्रग्ज विक्रीचा मास्टरमाइंड असून त्याच्या माध्यमातून हे एमडी शहरात आणले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे या तडीपार गावगुंडाच्या शोधार्थ आता शहर पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ सेवन व विक्री करण्याऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपी मयूर गजानन नाकाडे रा कारला चौक याला छत्रपती शिवाजी चौकातून ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याजवळून ५९ मिलीरॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज त्याने धंतोली परिसरातील रहिवासी अमोल वंजारी याच्यासाठी विक्री करीत असून यासाठी अमोल मयूरला कमिशन देत असल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी आरोपी अमोल वंजारी याला मोठ्या शिताफीने अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिस कोठडी दरम्यान अमोलला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तडीपार असलेला आरोपी बाटला उर्फ राहुल बहादुरे रा स्टेशन फैल हा वर्ध्यात एमडी पावडरचा माल विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी बाटलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी, पंकज भरणे, श्रावण पवार, प्रशांत वंजारी, नितेश भोयर यांनी केली.
आरोपी पोलिसांच्या ‘रडार’वर
आरोपी बाटला याला पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशन्वये मागील वर्षीच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. मात्र, तरी देखील तो वर्ध्यात अमली पदार्थ विक्री करीत असल्याचे आता पुढे आले असल्याने आरोपी ‘बाटला’च्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झालेले आहे. तो पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी यांनी सांगितले आहे.