माहिती अधिकारात सत्यप्रत मागणाऱ्यांना आर्थिक दणका; सेलू नगरपंचायतीचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 14:52 IST2022-09-01T14:52:33+5:302022-09-01T14:52:45+5:30
या मनमानी कारभाराला आवर घालण्याची मागणी होत आहे.

माहिती अधिकारात सत्यप्रत मागणाऱ्यांना आर्थिक दणका; सेलू नगरपंचायतीचा मनमानी कारभार
सेलू (वर्धा) : सेलू नगरपंचायतीने माहिती अधिकारात कागदाच्या सत्य प्रतिलिपी मागणाऱ्याला प्रतिपान ५ रुपये असा आर्थिक बोजा लादला आहे. नियमानुसार २ रुपये प्रतिपान घेणे बंधनकारक असताना पाच रुपये आकारले जात असल्याने ही अतिरिक्त रक्कम कशासाठी, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार सत्य प्रतिलिपीसाठी केवळ दोन रुपये प्रतिपान शुल्क आहे. मात्र, सेलू नगरपंचायतीने २९ जुलै २०२२ च्या सभेत ठराव क्रमांक ४ नुसार माहिती अधिकाराच्या सत्य प्रतिलिपीचे शुल्क पाच रुपये केले आहे. त्यामुळे नगरपंचायतीला माहितीच्या अधिकाराचा शुल्क आपल्याच मनाने वाढविता येतो का, असाही प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ता विचारत आहे.
नगरपंचायतीच्या मते नगरपंचायतचा खर्च चालविण्यासाठी प्रत्येक कागदपत्र देताना शुल्क आकारले जाते. त्यासाठी सेलू नगरपंचायतीने जन्मदाखला प्रमाणपत्र ५० रुपये, मृत्यू दाखला ५० रुपये, अपत्य दाखला २०० रुपये, वारसा प्रमाणपत्र २०० रुपये, व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र ५०० रुपये, कर थकबाकी नसल्याचा दाखला १५० रुपये, विद्युत ना हरकत प्रमाणपत्र २०० रुपये, कर आकारणी नमुना ४३ व चतु:सीमा गावठाण प्रमाणपत्र १५० रुपये तर माहितीचा अधिकार सत्यप्रत शुल्क पाच रुपये प्रतिपान मंजूर करताना नगरपंचायतीकडून प्रदान करण्यात येणाऱ्या विविध सेवा शुल्क मंजूर करणे, या विषयांतर्गत ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्याप्रमाणे ही आकारणी सुरू झाली आहे. याला कायदेशीर किती आधार आहे, हे नगरपंचायतीलाच माहीत. माहितीच्या अधिकारात माहिती मागणारे कार्यकर्ते प्रतिपान दोन रुपये शुल्क भरण्यास तयार आहे. परंतु शेकडो पानांची महिती घेताना प्रतिपान पाच रुपये म्हणजे खिशाला मोठा भुर्दंड बसणार असल्याने नगरपंचायतीच्या या मनमानी कारभाराला आवर घालण्याची मागणी होत आहे.
नगरपंचायतीकडून माहिती अधिकारात माहिती देताना दोन रुपये प्रतिपान शुल्क आकारले जाते. मात्र, तेच पान साक्षांकित करून लागत असल्यास त्याला ५ रुपये शुल्क आकारले गेले आहे. हे माहिती अधिकाराच्या नियमानुसार करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या सभेत या ठरावाला मान्यता सुद्धा देण्यात आली आहे.
- रघुनाथ मोहिते, प्रशासन अधिकारी नगरपंचायत सेलू.