Wardha | विचित्र अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी; वडनेर पोलिसात गुन्हा दाखल
By चैतन्य जोशी | Updated: September 8, 2022 18:19 IST2022-09-08T18:17:05+5:302022-09-08T18:19:28+5:30
सिरसगाव येथील घटना

Wardha | विचित्र अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी; वडनेर पोलिसात गुन्हा दाखल
वर्धा : भरधाव वाहनाने गाईला जाेरदार धडक दिली. या धडकेत गाय थेट समोरुन येणाऱ्या दुचाकीवर जाऊन धडकल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील मागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा विचित्र अपघात ७ रोजी रात्रीच्या सुमारास सिरसगाव परिसरात झाला. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. वामन कोसळे असे मृतकाचे नाव असून आकाश विठ्ठल बावणे असे जखमीचे नाव आहे.
वामन कोसळे आणि आकाश बावणे हे दोघे एम.एच. ३२ ए.सी. ५४४९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना समोरुन भरधाव येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या मधात असलेल्या गाईला जबर धडक दिली. जखमी झालेली गाय थेट वामन चालवित असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळल्याने वामन व त्याचा मित्र आकाश दोघेही जमिनीवर कोसळले.
स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेला बोलावून दोघांनाही वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले असता डॉक्टरांनी वामन कोसळे याला मृत घोषित केले. तर आकाश बावणे याच्या मृत्यूपूर्व बयाणावरुन वडनेर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.