मुलीशी लग्नाचा तगादा; आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2022 17:46 IST2022-12-01T17:41:47+5:302022-12-01T17:46:53+5:30
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा

मुलीशी लग्नाचा तगादा; आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
वर्धा : अल्पवयीन मुलीला लग्नाचा तगादा लावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी गजानन रघुनाथ सयाम (२६) रा. सावरडोह याला ३ वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड तसेच ३ हजार रुपये पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निर्णय तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांनी दिला.
पीडिता पाचव्या वर्गात शिक्षण घेत असताना १ जानेवारी २०२२ रोजी तिचे वडील शेतात कामासाठी गेले होते. आई बँँकेत गेली होती. पीडिता ही घरी एकटीच होती. दुपारच्या सुमारास आरोपी गजाननने घरात अनधिकृतपणे प्रवेश करून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझा मोबाइल नंबर दे, आपण दोघे लग्न करू’ असा तगादा लावत होता. तेवढ्यात पीडितेची आई आली. पीडिता व तिची आई हे आरोपीच्या घरी गेले असता आरोपीच्या आईने माझा मुलगा तसा नाही असे म्हणाली. त्यावेळी आरोपी हा त्याच्या घरातच हजर होता परंतु तो घराच्या बाहेर आला नाही.
याबाबतची तक्रार पीडितेने कारंजा पोलिसात दिली. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहून यशस्वी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी फौजदार अशोक सोनटक्के यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली.
आईची साक्ष ठरली महत्त्वाची
आरोपी गजानन सयाम याला पीडितेच्या आईने घरातून पळताना पाहिले होते. शासनातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पीडितेची आई व इतर साक्षीदारांची साक्ष आरोपीला शिक्षा होण्यास महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून. न्यायाधीश आर. जे. राय यांनी ३० रोजी एक वर्षाच्या सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली.