Maharashtra Election 2019 : थेट लढतीत प्रस्थापित उमेदवारांचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:41+5:30
कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना मिळालेली मते या मतदारसंघात निकालावर प्रभाव पाडणारी ठरणार आहेत. तसेच शहरी भागात सुज्ञ मतदार, हिंदी भाषीक यांची भूमिकाही निर्णायक ठरणारी आहे.

Maharashtra Election 2019 : थेट लढतीत प्रस्थापित उमेदवारांचा लागणार कस
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात यावेळी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित तीन मतदारसंघात कॉँग्रेस आघाडी व भाजप-सेना युतीत थेट लढत असल्याचे दिसून येत आहे. थेट लढतीमध्ये प्रस्थापित लोकप्रतिनिधींचा मोठा कस प्रचारादरम्यान लागत आहे. तसेच गेल्यावेळी रिंगणात असलेले अनेक उमेदवार बाहेर असल्याने त्यांचीही भूमिका या निवडणुकीत अंत्यत महत्त्वाची ठरणार आहे.
आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार अमर शरद काळे यांचा सामना भाजप-सेना युतीचे उमेदवार दादाराव केचे यांच्यासोबत आहे. प्रत्येक निवडणुकीत दोन ते तीन हजार मतांच्या अंतराने या मतदारसंघाचा निकाल फिरत राहिला आहे. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघात कसदार लढाई होणार आहे. दादाराव केचे यांनी मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या मतदारसंघात मंगळवारी कॉँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे. त्यानंतर या मतदारसंघाचे चित्र आणखी स्पष्ट होईल. या मतदारसंघात विद्यमान आमदारांसमोर अॅन्टी इन्कबन्सीचा प्रश्न प्रभावीपणे उभा आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रा. राजू तिमांडे व शिवसेना बंडखोर अशोक शिंदे यांच्यात लढत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक आधारावर या मतदार संघात प्रचाराने जोर पकडला आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली आहे. येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस व बंडखोराने अनेक भागात जोरदार धडाका लावल्याने भाजपसमोर अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. येथे राष्ट्रवादीला कॉँग्रेसची समर्थ साथ असल्याचे दिसून येत आहे. मात्र, भाजपला सेनेची साथ असल्याचे कुठेही दिसत नाही. सेनेने बंडखोरांवर अजूनही कारवाई केली नसल्याने सेनेचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी जोरदार कामाला लागले आहेत.
वर्धा मतदारसंघात विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणारे विद्यमान आमदार पंकज भोयर यांची प्रचार यंत्रणा गावागावांत कामाला लागली आहे. मात्र, या मतदारसंघात त्यांच्यासमोर कॉँग्रेसचे तुल्यबळ आव्हान आहे. कॉँग्रेस उमेदवाराला राष्ट्रवादीची समर्थ साथ येथे मिळाली आहे. या मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रा. सुरेश देशमुख, शिवसेनेकडून रविकांत बालपांडे व भाजपचे बंडखोर वीरेंद्र रणनवरे मैदानात होते. यावेळी हे तिन्ही उमेदवार मैदानाच्या बाहेर आहेत. यांना मिळालेली मते या मतदारसंघात निकालावर प्रभाव पाडणारी ठरणार आहेत. तसेच शहरी भागात सुज्ञ मतदार, हिंदी भाषीक यांची भूमिकाही निर्णायक ठरणारी आहे.
देवळी मतदारसंघात कॉँग्रेसच्या विद्यमान लोकप्रतिनिधीविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या वीस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या या लोकप्रतिनिधीचे एकही ठोस काम त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांसमोर मांडलेले नाही. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या मतदारसंघात शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपचे खा. रामदास तडस यांच्यासह माजी खा. सुरेश वाघमारे, डॉ. शिरीष गोडे, ज्येष्ठ नेते प्रशांत इंगळे तिगावकर, मिलिंद भेंडे यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी तसेच सेनेचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. कॉँग्रेस पक्षातून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्व नेते शिवसेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे कॉँग्रेसमोरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या मतदारसंघात अपक्ष म्हणून राजेश बकाणे यांनीही जोरदार प्रचार चालविला आहे. येथे बहुजन समाज पक्षासह वंचित बहुजन आघाडी व अपक्ष उमेदवार निर्णायक राहणार आहेत.