Maharashtra Election 2019 ; मतविभाजनावर देवळीचा निकाल अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:20+5:30
गेल्या चाळीस वर्षांपासून मावशी व भाचा या दोघांचे वर्चस्व असलेल्या सुरुवातीच्या पुलगाव व नंतरच्या देवळी मतदारसंघात यावेळीही जोरदार लढाई ...

Maharashtra Election 2019 ; मतविभाजनावर देवळीचा निकाल अवलंबून
गेल्या चाळीस वर्षांपासून मावशी व भाचा या दोघांचे वर्चस्व असलेल्या सुरुवातीच्या पुलगाव व नंतरच्या देवळी मतदारसंघात यावेळीही जोरदार लढाई होत आहे. गेल्या वीस वर्षांपासून आमदार असणाऱ्या रणजित कांबळे यांची या निवडणुकीत सत्त्वपरीक्षा आहे. निवडून गेल्यानंतर साडेचार वर्षांनंतरच दर्शन देणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची या मतदारसंघात ओळख आहे. यावेळी जातीय समीकरणात शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात जोरदार मुसंडी मारून आहे. शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. ते नवा चेहरा असल्याने भाजपचे बहुतांशी नेते त्यांच्यासोबत प्रचारात असल्याचे दिसून येत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच या मतदारसंघात रणजित कांबळेंची साथ सोडून दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत रणजित कांबळे यांच्यामुळे चारूलता टोकस यांना या मतदारसंघात जोरदार फटका बसला. त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघापासून कोसोदूर आहेत. प्रभाताई राव यांना मानणारा मतदारांचा मोठा वर्ग रणजित कांबळेंच्या कामगिरीवर नाराज आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, अपक्ष राजेश बकाणे, दिलीप अग्रवाल, उमेश म्हैसकर हे प्रमुख उमेदवार किती मतांचे विभाजन घडवून आणतात, यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होईल, याशिवाय दलित व मुस्लिम व मतांमध्येही विभागणी होण्याची शक्यता आहे.
बंडखोराची चर्चा जोरात
हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले राजेश बकाणे यांनी येथे बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीची मोठी चर्चा या मतदारसंघात आहे. तर काँग्रेसमध्ये असताना मेघे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिलीप अग्रवाल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपचा मोठा फौजफाटा बकाणेंच्या प्रचारात दिसत असला तरी शिवसेना व खासदार रामदास तडस यांच्यासह भाजपचे सर्व मातब्बर युतीचे उमेदवार समीर देशमुख यांच्यासोबतच आहेत. त्यामुळे शिवसेना येथे निकरीची झुंज देत आहे.
या मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. देवळी व पुलगाव या नगर पालिका भाजपच्या हातात आहेत. खासदार रामदास तडस यांची भूमिका या मतदारसंघात अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपला येथे निसटता पराभव पाहावा लागला. यावेळी शिवसेना हा गड सर करेल काय? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.
देवळी मतदारसंघात शिवसेना उमेदवार समीर देशमुख यांना सहकार गटासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना यांच्या कार्यकर्त्यांची समर्थपणे साथ मिळाली आहे. बापूरावजी देशमुख यांच्या काळातील सहकार गटाचे अनेक जुने पदाधिकारी समीर देशमुख यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.