हेलिकॉप्टरच्या घिरट्या, शिंदे म्हणाले प्रयत्न कर, पायलट म्हणाला ‘महागात’ पडेल
By रवींद्र चांदेकर | Updated: July 22, 2025 20:27 IST2025-07-22T20:26:46+5:302025-07-22T20:27:30+5:30
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा : शेवटी 'समृद्धी'ने आले वर्ध्यात

Helicopter hovers, Shinde says try, pilot says it will be 'expensive'
वर्धा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी दुपारी ०२:३० वाजेच्या सुमारास वर्धेत येत असताना मुसळधार पावसामुळे त्यांचे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होते. पायलटने हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी दृश्यता कमी असल्याचे सांगताच शिंदे यांनी त्यांना प्रयत्न करण्यास सांगितले. मात्र, पायलटने प्रयत्न ‘महागात’ पडेल, असे सांगताच, अखेर हेलिकॉप्टर माघारी नागपूरला नेण्यात आले. अखेर शिंदे समृद्धी महामार्गाने येथे दाखल झाले.
सेवाग्राम येथील चरखा भवनात मंगळवारी ‘निरामय वर्धा’ अभियानांतर्गत मोतीबिंदूमुक्त वर्धा जिल्हा अभियानाचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा किस्सा सांगितला. कार्यक्रमाला मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, आमदार नरेंद्र भोंडेकर, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, किरण पांडव, मंगेश चिवटे आदींची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी वर्धेत एकदा नव्हे, तर आताच दोनदा आलो. पायलटने प्रयत्न महागात पडेल, असे सांगताच, हेलिकॉप्टर माघारी फिरविले. मात्र, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा आग्रह आणि सर्व जनतेच्या प्रेमामुळे मी अखेर समृद्धी महामार्गाने येथे आलो आहे. येथे येण्यात अनेक अडथळे आले. मात्र, तुमच्या प्रेमाने मला खेचून आणले. मी वादळ, वाऱ्याची पर्वा करीत नाही. मला लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, बळीराजाला भेटण्याची इच्छा होती. त्यामुळे सर्व संकटांवर मात करून येथे आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दुसऱ्या ‘इनिंग’मध्येही राज्य आघाडीवर
आम्ही टीकेला कामातून उत्तर देतो. महाविकास आघाडीने अनेक योजना बंद केल्या होत्या, त्या आमच्या सरकारने पुन्हा सुरू केल्या. आमच्या सरकारची दुसरी इनिंग सुरू झाली. या इनिंगमध्येही राज्य सकल राष्ट्रीय उत्पन्न, परकीय गुंतवणूक, आरोग्य या क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या योजनांना पाठबळ देतात, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आत्महत्याग्रस्त विदर्भाला दिलासा
जिल्ह्यात पूर्वी दोन वैद्यकीय महाविद्यालये होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तिसरे वैद्यकीय महाविद्यालय प्राप्त झाले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा- नळगंगा प्रकल्पाची घोषणा केली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळून दिलासा मिळेल, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.