सेलू तालुक्यात 'एमआयडीसी'ची मागणी धूळखात; बेरोजगारांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:25 IST2025-02-20T17:25:06+5:302025-02-20T17:25:39+5:30
Wardha : रिकाम्या हातांना काम मिळत नाही, येथे उद्योगधंद्यांचीही आहे वानवा

Demand for 'MIDC' in Selu taluka falls flat; Unemployed people cry out
प्रफुल्ल लुंगे
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : सर्व दृष्टीने सुजलाम, सुफलाम असलेल्या सेलूला एमआयडीसी व्हावी ही बऱ्याच वर्षांची मागणी दुर्लक्षित आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने तो मानसिकदृष्ट्या दिव्यांग होत चालला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वच गोष्टींनी सेलू तालुका अग्रेसर असताना येथे एमआयडीसी का होत नाही, असा आक्रोश आता तरुण करू लागले आहेत. सेलू तालुक्यात बोरधरण आहे. एवढेच नव्हे तर सिंचनाच्या दृष्टीने सर्व गावात बऱ्यापैकी व्यवस्था आहे.
नागपूर-तुळजापूर मार्ग व समृद्धी मार्ग लागूनच गेल्याने चांगल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. एवढेच नव्हे तर पाच-सहा किलोमीटरवर सुकळी रोड रेल्वे स्टेशन सुद्धा पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे सेलू-सुकळी मार्गावर एमआयडीसी होणार हे पूर्वीपासून चर्चेला गेले. मात्र कृतीत उतरले नाही. आता हा मार्ग हिंगणा, हिंगणी, घोराड, सेलू, मदनी, सोनेगाव असा महामार्गसुद्धा झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग व तुळजापूर महामार्गाच्या मध्ये मोठी शेतजमीन उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळाला तर एमआयडीसीसाठी जागेची व पाण्याची अडचण नाही. त्यामुळे सेलूतील बेरोजगार व व्यावसायिकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमआयडीसीच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी तरुणांसह व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे.
तालुक्यात दर्जेदार केळी व कापसाची उपलब्धता...
सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन असल्याने लांब धाग्याचा दर्जेदार कापूस पिकविला जातो. त्यामुळे येथील कापसाला मोठी मागणी असते. या भागात मोठ्या प्रमाणात जिनिंग प्रेसिंगचे उद्योग सुरू झाले आहेत. तसेच दर्जेदार केळीसाठी पूर्वीपासून तालुका प्रसिद्ध आहे. त्यामुळे केळीवर प्रक्रिया करणारा उद्योग व कापसापासून तयार होणारा कापड प्रक्रिया उद्योग व इतरही उद्योग इथे निर्माण झाल्यास एमआयडीसी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर राहील, असा उद्योग क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.
उच्च शिक्षितांची कमी नाही पण, रोजगाराचा प्रश्न
तालुक्यात उच्च शिक्षितांची काही कमी नाही. परंतु एकही उद्योग नाही. संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक असे डॉक्टर, इंजिनिअर व शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, प्राचार्य संपूर्ण विदर्भावर नव्हे तर महाराष्ट्रावर छाप पाडून आहे. उच्चशिक्षित वर्गाबरोबरच सर्वसामान्य मजूर, सुशिक्षित बेरोजगार यांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कामाची अपेक्षा आहे. एमआयडीसी निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात उद्योग व रिकाम्या हाताला काम मिळेल अशी अपेक्षा आहे.
पालकमंत्र्यांकडून अपेक्षा
सेलू तालुक्यात एमआयडीसी व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून असली तरी ती मागे पडली आहे. वर्धा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून डॉ. पंकज भोयर हे कृतिशील व्यक्तिमत्त्व लाभले आहे. त्यांच्या डोक्यात अनेक सकारात्मक कल्पना असतात आणि ते कृतीतही आणतात, त्याची प्रचिती अनेकांना येत आहे. लोकांनी त्यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. सध्या ते राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आता त्यांच्याकडून उद्योजक व बेरोजगारांच्या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत. त्यांनी मनावर घेतले तर एक मोठा प्रश्न ते मार्गी लावू शकतात. त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे व सेलूत एमआयडीसीचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा भावी उद्योजक व बेरोजगारांकडून व्यक्त केली जात आहे