चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध लखनऊ जाईंड्स सामन्यावर सट्टा; ९२ हजारांच्या रोखेसह १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By चैतन्य जोशी | Updated: April 4, 2023 17:46 IST2023-04-04T17:46:03+5:302023-04-04T17:46:41+5:30
बुकी सुनिल सावरकरला बेड्या

चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध लखनऊ जाईंड्स सामन्यावर सट्टा; ९२ हजारांच्या रोखेसह १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : ३ रोजी चेन्नई येथील मैदानावर सुरु असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाईंड्स या क्रिकेट सामन्यावर मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हारजितीचा जुगार खेळविणारा मुख्य बुकी सुनिल मधुकर सावरकर रा. टाकळी झ. याला अटक केली. ही कारवाई क्राईम इंटेलिजन्स पथकाने केली.
३० मार्चपासून देशात आयपीएल क्रिकेट लीग सुरु आहे. क्रिकेटच्या सामन्यांवर अनेक जण पैसे लावून हारजितीचे खेळ खेळत असतात. सेलू तालुक्यातही क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३ रोजी आरोपी सुनिल सावरकर हा एका आयडीवरुन काही लोकांकडून क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली. सावरकर हा त्याच्या घराच्या आजुबाजुचे परीसरातून क्रिकेट सामन्यांवर ‘बेटींग’ करण्याचे काम करत असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून त्याच्यावर छापा मारला असता सटोडा सुनिल सावरकर हा ऑनलाईन पद्धतीने क्रिकेट सामन्यांवर बेटिंग करताना मिळून आल्याने त्यास अटक केली.
सटोड्याजवळ मिळाली ७५ लाखांची आयडी
क्राईम इंटेलिजन्स पथकाला सटोडी सुनिल सावरकर याच्यावर संशय होता. मागील काही दिवसांपासून पोलिस त्याच्यावर नजर ठेवून होती. अटके दरम्यान त्याच्याजवळील मोबाईलची पडताळणी केली असता नाईस २४ प्राे या आयडीमध्ये १५ लाख, टाटा ९९९.फन या आयडीमध्ये ५० लाख तर दुबई एक्सचेंज या आयडीत १० लाख रुपये असे एकूण ७५ लाख रुपयांचे क्रेडीट असल्याचे दिसून आले.